‘दादा-बापू‌’ राजकीय संघर्षाला अखेर पूर्णविराम! 
सांगली

Sangli Politics‌ : ‘दादा-बापू‌’ राजकीय संघर्षाला अखेर पूर्णविराम!

दोन्ही नेत्यांच्या वारसदारांचा एकत्रित राहण्याचा संकल्प : आमच्यातील संघर्षाचा काहींनी फायदा उचलला

पुढारी वृत्तसेवा

मारुती पाटील

ईश्वरपूर : पुरोगामी विचारांच्या व क्रांतिकारकांच्या जिल्ह्यात जातीवादी विचार चंचू प्रवेश करत असतील, तर आम्हाला मतभेद मिटवावेच लागतील. एवढे शहाणपण आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिले आहे, असे सांगून दादा-बापू राजकीय संघर्षाला कायमचा पूर्णविराम मिळाल्याचे त्यांच्या वारसदारांनी जाहीर केले. लोकनेते राजारामबापूंच्या गावात वसंतदादांच्या नातवाचे आम्ही जाहीर स्वागत करतो, असे सांगून आ. जयंत पाटील यांनी दादा व बापू यांच्यात मुळात टोकाचा संघर्ष नव्हताच, असे वक्तव्य केले.

कासेगाव येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी आयोजित केलेल्या विकास आघाडीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभात लोकनेते राजारामबापूंचे चिरंजीव व राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील व वसंतदादांचे नातू खा. विशाल पाटील यांच्यात चांगलीच शाब्दिक जुगलबंदी रंगली. जुन्या आठवणींना उजाळा देत दोघांनीही आमच्यातील हा कथित संघर्ष आता संपला असल्याचे सांगितले.

कासेगावला येताना या कार्यक्रमाला जावे की नको या विचारात होतो. चुकून जुनीच भाषणे तोंडात आली तर काय करायचे, हा विचारही मनात होता. आमच्या घराण्यांनी खूप संघर्ष बघितलाय. या संघर्षामुळेच कुठे ना कुठे आम्ही मागे पडलो. या संघर्षाचाच फायदा घेऊन काही जातीयवादी विचार जिल्ह्यात शिरू पाहत आहेत. दादा-बापूंच्यात राजकारणात भले मतभेद झाले असतीलही. मात्र ते दोघे एकमेकांवर शेवटपर्यंत प्रेम करीत होते. आम्हाला हे वाद न समजल्यामुळे दुर्दैवाने त्याचे राजकीय संघर्षात रूपांतर झाले. मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने योगायोगाने आम्हाला एकत्रित येण्याची संधी प्राप्त झाली आहे. यापुढे काही वाद असले तरी भाजपला रोखण्यासाठी आम्ही एकत्रितच राहू, असे सांगत खासदार विशाल पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

आ. जयंत पाटील यांनी वसंतदादांचा नातू आमच्या गावात येतोय त्याचे आम्ही स्वागत करतो, असे सांगून आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, बाहेर लोकांना वाटायचे दादांच्यात व बापूंच्यात टोकाचा वाद आहे. मुळात मी असे अनेक प्रसंग पाहिले आहेत की, दादा कासेगावला आमच्या घरी यायचे. एकदा माझ्या वाढदिवसालाही ते मुंबईतल्या घरी आले होते. दादा मुख्यमंत्री, राज्यपाल असताना मी अनेकवेळा त्यांच्याकडे जायचो. मला कधीही दरवाजात अडवले जायचे नाही. यापुढे जातीय विचारांना रोखण्यासाठी आम्हाला आमच्यातील मतभेद मिटवावेच लागतील, असेही आ. जयंत पाटील यांनी जाहीर केले.

दादा व बापूंच्या वारसदारांच्या या भूमिकेमुळे गेली 50- 55 वर्षे सुरू असलेला राजकीय संघर्ष आता संपल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सन 1967 मध्ये सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला वारणा नदीवर बांधण्यात येणाऱ्या धरणाच्या जागेवरून सुरू झालेला हा राजकीय वाद या नेत्यांच्या तिसऱ्या पिढीपर्यंत धुमसत होता. जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीने हा वाद मिटवण्यास भाग पाडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT