Jayant Patil: संजयकाकांनी नवा मार्ग दाखवला Pudhari
सांगली

Jayant Patil: संजयकाकांनी नवा मार्ग दाखवला

जयंत पाटील यांचा टोला; आम्हीच त्यांना भाजपात पाठवले

पुढारी वृत्तसेवा

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीबरोबर राष्ट्रवादी अजितदादा गटाचे माजी खासदार संजय पाटील आघाडीसोबत राहिले, आमच्या आघाडीवर विश्वास दाखवून लोकांनी आम्हाला घवघवीत यश दिले. मात्र अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या आदल्या रात्री संजय पाटील यांनी भाजपसोबत जाऊन राजकारणातला नवा मार्ग आम्हाला दाखवला, मी त्यांचे याबाबत विशेष आभार मानतो, असा टोला माजी मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. आम्हीच त्यांना भाजपात पाठवले, असेही ते उपरोधाने म्हणाले.

ते म्हणाले, संजय पाटील यांच्यामुळे आम्हाला अचानकपणे राजकीय रणनीती दुरुस्त करावी लागली. राजकारणातला नवा मार्ग त्यांनी आम्हाला दाखवून दिला, तिकडे जाऊन त्यांनी विशेष योगदान दिले. भाजपसोबत जाऊन मोलाची मदत केली आहे. जिल्हा पुरोगामी राहावा यासाठी आम्ही एकसंधपणे निवडणूक लढलो. यानिमित्ताने आर. आर. आबा पाटील यांची आठवण येते. आबा असताना जिल्हा परिषदेवर काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेहमी वर्चस्व राहिले आहे. केलेला ग्रामविकास पथदर्शी राहिला आहे. त्यांच्याप्रमाणे ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही एकत्र काम करू.

शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा अशा महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य देऊन आम्ही काम करू, राज्य व केंद्रातील सत्ता आणि जिल्हा परिषद सत्ता वेगळी असली तरी, सर्व निधीबाबत काही परिणाम होणार नाही. उलट चांगले व पारदर्शी काम आम्ही करू, असा विश्वास आहे.

सांगलीच्या लोकांनी पुरोगामी विचारांना कौल दिला आहे. भाजपची सत्ता असतानाही सात तालुक्यांतही महाविकास आघाडीचे सभापती झाले. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढलो, त्याचा फायदा झाला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आम्ही करू. सर्व तालुक्यांतील लोकांना विश्वासात घेऊन प्रश्न सोडवू. बहीण भारतीताई यांच्या मुलाला जिल्हा परिषदेत सदस्य करून आता उपाध्यक्षही केले. हा आनंदाचा क्षण आहे.
- आ. डॉ. विश्वजित कदम, काँग्रेस नेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT