इस्लामपूर ः माझ्या कार्यकर्त्यांना कोणी धमकावले, दम दिला, केसाला जरी धक्का लावला तर याद राखा, मी कार्यकर्त्यांच्या मागे उभा आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी विरोधकांना दिला.
येथील गांधी चौकात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, राजवर्धन पाटील, प्रा. शामराव पाटील, अॅड. चिमण डांगे, शहाजी पाटील, मैनुद्दीन बागवान, सुभानअली शेख, सुकुमार कांबळे, अॅड. मनीषा रोटे, बी. जी. पाटील, धनाजी गुरव, नेताजी पाटील, खंडेराव जाधव, रणजित मंत्री, कोमल बनसोडे, विश्वनाथ डांगे, संदीप पाटील राजेंद्र शिंदे, शकील सय्यद, शाकीर तांबोळी प्रमुख उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले, माझ्या कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे मोठ्या मताधिक्यांनी निवडून येऊ. अजित पवार यांचे मी आभार मानतो. कारण इथे कुणीतरी येऊन टीका केली. माझे काम सोपे होते, कारण माझ्यावर टीका झाली की माझे मतदार मला जादा मताधिक्य देतात. कदाचित माझी ही विधानसभेची शेवटची निवडणूक असेल. पुढे दिल्लीचा योग येऊ शकतो. शिवाय आमदार पदासाठीही मागे मोठी गर्दी होऊ लागली आहे.
दिलीप पाटील म्हणाले, आमदारपदाची मलाही स्वप्ने पडतात. परंतु आम्ही कधी निष्ठा ढळू दिली नाही. नेतृत्वाच्या मागे ठाम उभा राहिलो. अजित पवार म्हणतात, उसाला जादा दर दिला. मात्र त्यांनी त्यांच्या खासगी साखर कारखान्याचा दर किती दिला, तेही जाहीर करावे. यशवंत गोसावी म्हणाले, अजित पवार यांनी पक्ष चोरला, चिन्ह चोरले आणि उमेदवारपण चोरला. निष्ठा काय असते, हे दाखवणारा मुख्यमंत्री जयंत पाटील यांच्या रूपाने पाहायचा आहे.