ईश्वरपूर : राष्ट्रवादी पक्ष विलीनीकरणाच्या मुद्यावरून आ. जयंत पाटील व आ. सदाभाऊ खोत यांच्यात चांगलीच शाब्दिक जुगलबंदी रंगली आहे. ‘मी कधी शपथ घेतोय... याकडे काहींचे डोळे लागले आहेत. पण पडक्या घरात कोण राहायला जाईल का?’ असा टोला आ. खोत यांनी जयंत पाटील यांना लगावला; तर ‘दहा पक्ष बदलून आलेला हा बाबा माझ्यावर बोलत आहे. भाजपलाही माहीत आहे, तो कोणाचाच नाही. पण माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांना प्रसिद्धी मिळत नाही’, असे प्रत्युत्तर आ. पाटील यांनी दिले.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने वाळवा येथे झालेल्या प्रचार सभेत आ. खोत यांनी आ. पाटील यांना डिवचले. ते म्हणाले, ‘सध्या काहींचे, मी कधी मंत्रिपदाची शपथ घेतोय, याकडे डोळे लागले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष कधी एक होतोय... कधी एक होतोय... याची ते वाट पाहत आहेत. पण नेता तुमच्याकडे यायला तुमच्याकडे काय पन्नास आमदार आहेत काय? पडक्या घरात कोण राहायला जाईल? असा टोला खोत यांनी लगावला.