शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा राजीनामा (File Photo)
सांगली

Jayant Patil Resignation | 'हा शेवट नाही... एका नव्या पर्वाची सुरुवात'; पद सोडताच जयंत पाटील यांनी कवितेतून व्यक्त केल्या भावना

NCP Sharad Pawar Party | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील पायउतार

पुढारी वृत्तसेवा

NCP Leadership Change

इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आज आपल्या पदावरून पायउतार झाले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित केलेल्या पक्षाच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत जयंतराव पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केली. याच बैठकीत माजी मंत्री शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली.

यावेळी भावना व्यक्त करताना जयंतराव पाटील यांनी आपल्या कारकिर्दीचा उहापोह मांडला. यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्यापासून २०१९ ची लोकसभा-विधानसभा निवडणूक, २०२४ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीचा उल्लेख होता. जयंतराव पाटील म्हणाले की, याआधी पक्षात नेत्यांच्या मुलांनाच पदे मिळाली पण ही प्रथा मोडून काढत आम्ही मेहबूब शेख, सक्षणा सलगर, सुनील गव्हाणे अशा सामान्य घरातील तरुणांना संधी दिली. शुन्यातून लोकांना उभे करून त्यांना ताकद देण्याच काम शरद पवार यांनी केले. त्यांचा सारखा काम करणारा दुसरा नेता कोणी नाही असे सांगत असतानाच मी गेल्या २५ वर्षांपासून या पक्षात काम करत आहे. शरद पवार यांचा निर्णय मी नेहमीच अंतिम मानला आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे काही नाही असे म्हणत त्यांनी सर्वच चर्चांना विराम दिला.

सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य टिकवण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. संपूर्ण राज्यात आज धर्मांधतेचे विष पेरले जात आहे, महिलांवर अत्याचार वाढला आहे, विकासाच्या आडून भ्रष्टाचार होत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र अधोगतीकडे नेला जात आहे. आज जगाचा पोशिंदा असणारा आपला शेतकरी हवालदिल झाला आहे, त्यांच्या वर दुबार पेरणीचे संकट कुठे अतिवृष्टीमुळे तर कुठे दुष्काळ आहे. मागील मदतच अजून शेतकऱ्यांना मिळाले नाही. लातूर मध्ये तर शेतकऱ्यांनी स्वतः जुंपून घेतले असे महाराष्ट्रात कधीच पाहिले नव्हते. ६ महिन्यांमागे राज्यातील लोकांनी जे आश्वासन डोळ्यापुढे ठेऊन मतदान केले त्यातील एकही आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार होता, लाडक्या बहिणींना २१०० मिळणार होते, युवकांना नोकरी मिळणार होती, विकासकामांना निधी मिळणार होता पण अद्याप काहीच नाही. एकंदरीत काय तर हे सरकार दिलेला शब्द पाळण्यास असमर्थ ठरत आहे.

दरम्यान त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर टीका केली. विधानसभा निवडणूक खूप ताकदीने लढवली पण त्यात आपल्याला पाहिजे तसे यश प्राप्त नाही झाले, असे का झाले ? तर या मॅचचा अंपायर आधीच फिक्स झाला होता. स्टंपला बॉल लागून विकेट गेली तरी अंपायरने नो बोल दिला असे ते म्हणाले. आपला पक्ष गोर-गरीब माणसांचा आहे, शेतकरी कष्टकरी लोकांचा आहे आणि जनसामान्यांचा आहे. हा पक्ष पवार साहेबांचा आहे आणि या पक्षात प्रत्येक माणसाला पवार साहेबांशी थेट बोलण्याचा संपर्क करण्याचा अधिकार आहे. आपला पक्ष नेहमी लोकशाही पद्धतीने चालला आहे आणि तो पुढे ही तसाच चालला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली.

कवितेच्या माध्यमातून भाषणाचा शेवट

"हा शेवट नाही... एका नव्या पर्वाची सुरुवात आहे,

नवीन नेतृत्वातसुद्धा जुन्या निष्ठेचीच खरी बात आहे.

मी फक्त एक मुख्य सेनापती होतो, सेना अजूनही सज्ज आहे,

नव्या युगातही ‘शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार' हाच आमचा ध्यास आहे."

"मी जातो आहे, पण सोडत नाही,

एक पाऊल मागे घेतलंय, पण उद्दिष्टं अजूनही ठाम आहे.

कालही महाराष्ट्रासाठी होतो, आजही आहे,

नाव असेल किंवा नसेल, पण कामातूनच ओळख मिळेल, कारण मी 'जयंत' आहे.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT