इस्लामपूर : सध्या साखर कारखाना ऊस गाळपाचे दिवस कमी होत असल्याने प्रत्येक सभासदाने आपला ऊस आपल्या साखर कारखान्यास देऊन आपली साखर कारखानदारी टिकविण्यास, वाढविण्यास आपण प्राधान्य द्यायला हवे, अशी भावना माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी राजारामनगर येथे बोलताना व्यक्त केली. राज्यात सर्वात जास्त शेतकर्यांनी ऊस शेतीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्या कारखान्याकडे नांवे नोंदणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजारामबापू साखर कारखान्याच्या 56 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होते. राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, राजारामबापू सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, अध्यक्ष विजयराव यादव, उपाध्यक्ष माणिकराव पाटील, माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील, माजी सभापती रवींद्र बर्डे, बी. के. पाटील, बाळासाहेब पाटील, सुस्मिता जाधव, राजारामबापू दूध संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील उपस्थित होते. यावेळी आ. जयंत पाटील, अध्यक्ष प्रतीक पाटील यांचा दिल्ली येथे पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
आ. पाटील म्हणाले, एका बाजूला उत्पादन खर्च वाढला असताना दुसर्या बाजूला एकरी उत्पादन कमी झाले आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी उत्पादन वाढ करायला हवी. आपल्या कारखान्याचा तो प्रयत्न असून मोठ्या संख्येने शेतकरी या प्रकल्पास प्रतिसाद देत आहेत. आपण बाहेरच्या कारखान्यांना ऊस देऊन काय साध्य करतो? आपण विश्वासार्हता जपली असून पारदर्शी व्यवस्था निर्माण केली आहे. जो नैसर्गिक दर आहे, तो द्यायला हवा. राजकारणासाठी ओढून-ताणून दर देणे घातक आहे. राजकारण आणि साखर कारखाना या वेगवेगळ्या बाबी आहेत. केंद्र सरकारने साखरेचे व इथेनॉलचे दर वाढवावेत, यासाठी काही प्रयत्न झाले. मात्र त्यास फारसे यश आलेले नाही. उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्याऐवजी मक्यापासून, भातापासून इथेनॉल तयार करावे, असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.
पी. आर. पाटील म्हणाले, गेल्या वर्षी राज्यातील 281 साखर कारखान्यांपैकी 200 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम पूर्ण केला आहे. राज्यात बहुतेक साखर कारखान्यांचे ताळेबंद तोट्यात असून ज्या 4-5 साखर कारखान्यांचे ताळेबंद नफ्यात आहेत, त्यामध्ये आपल्या साखर कारखान्याचा सहभाग आहे. केंद्र सरकारने साखर विक्रीचे दर वाढविले नाहीत, हा खरा प्रश्न आहे. आपण सर्वांनी एकसंधपणे एकरी उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करायला हवा.
प्रतीक पाटील म्हणाले, यावर्षी सर्वांच्या सहकार्याने गाळप वाढविणे, शेतकर्यांना चांगला ऊस दर देण्यावर आपला भर आहे. आपण नुकताच राज्यात सर्वप्रथम 1 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प सुरू केला. कारखान्याचे आधुनिकीकरण, उपपदार्थ निर्मिती, देशी-विदेशी क्षमता वाढ, वाफेची बचत आणि वार्षिक उलाढाल वाढ ही आपली उद्दिष्टे आहेत. कारखान्याच्या एआय प्रकल्पात 1 हजार 89 शेतकरी सहभागी झाले आहेत. यावेळी शेतकरी संघटनेचे रवींद्र पिसाळ साखराळे, शंकरराव मोहिते साखराळे, लक्ष्मण पाटील गोटखिंडी यांच्यासह काहीजणांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्यास समाधानकारक उत्तरे देण्यात आली. प्रारंभी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी श्रद्धांजली ठराव मांडला. कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी नोटीसवाचन करून सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. सचिव डी. एम. पाटील यांनी मागील इतिवृत्ताचे वाचन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी आभार मानले. संदीप तांबवेकर यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी बी. डी. पवार, दिलीपराव वग्याणी, संभाजी कचरे, प्राचार्य आर. डी. सावंत, रणजित पाटील, संजय पाटील, सुनीता देशमाने, भीमराव पाटील, शंकरराव पाटील, अॅड. एन. आर. पाटील, शहाजी पाटील, सर्जेराव देशमुख, संग्राम जाधव, देवराज देशमुख, कामगार युनियनचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष तानाजीराव खराडे यांच्यासह आजी-माजी संचालक व ऊस उत्पादक सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.