India US Trade deal
ईश्वरपूर : अमेरिकेबरोबरच्या करारामुळे भारतावर नवे संकट आले आहे. या कराराने भारतातील शेतकऱ्यांचे पाणीपत होईल. तर शेतीही उद्ध्वस्त होईल, अशी भीती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. हा करार म्हणजे अमेरिकेतील शेतकऱ्यांना गालीच्या तर भारतातील शेतकऱ्यांच्यासाठी काटेरी वाट आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
आ. जयंत पाटील म्हणाले की, या नव्या करारामुळे अमेरिकेतील सर्व माल शून्य टक्के कराने भारतात येईल. तर भारतातील मालावर अमेरिकेत 18% कर लागेल. यापूर्वी भारतीय मालाला अडीच ते तीन टक्के एवढाच कर लागू होता. भारतातील शेतकरी आधीच अडचणीत आहे. त्याच्याकडे आधुनिक यंत्रणा, शेतीसाठी लागणारी मोठी यंत्रसामग्री नाही. आधी आपला शेतकरी कोणत्याही सुविधेविना, यंत्रणांशिवाय आपल्या मातीत कष्ट करतोय. आता त्यात सरकारनेही नवी भर घातली आहे. आपला शेतकरी अमेरिकेतील दोन - अडीच हजार एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्याबरोबर कसा स्पर्धा करणार आहे? तेथील दुग्धजन्य पदार्थ व शेतमाल भारतात कमी दराने आला तर येथील शेती क्षेत्रच संकटात येईल.
ते म्हणाले, असेच एकदा फ्रान्स देशात झाले होते. अनेक दुग्धजन्य पदार्थ फ्रान्समध्ये कमी दरात आयात व्हायचे. याने फ्रान्सच्या दुग्ध व्यवसायावर परिणाम झाला होता. त्यानंतर त्यांना विविध उपाययोजना कराव्या लागल्या होत्या. या विषयावर संसदेत चर्चा व्हायला हवी, केंद्र सरकारने याबाबत देशातील शेतकऱ्यांना समजावून सांगितले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.