Jayant Patil File Photo
सांगली

Jayant Patil : जे झालं ते विसरून अजित पवार यांना राष्ट्रवादी एकसंध करायची होती

आ. जयंत पाटील यांची माहिती; 12 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा होणार होता निर्णय

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : जे माझ्याबद्दल जनमानसात आहे, ते पुसून मी पुन्हा साहेबांसोबत एकत्र यायला तयार आहे. जे झालं ते विसरून आपण एक होऊ आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकसंध करू, ही अजित पवार यांची आग्रहाची भूमिका होती. त्यांना शरद पवार साहेबांबद्दल प्रचंड आदर होता. येत्या 12 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करण्याचा निर्णय जाहीर होणार होता, अशी माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील यांनी येथे माध्यमांशी बोलताना दिली.

आ. जयंत पाटील म्हणाले, अलीकडच्या काळात अजित पवार बऱ्याच वेळा माझ्या घरी आले होते. त्यांची-माझी चर्चाही झाली होती. बऱ्याच वेळेला ते सायंकाळी येऊन जेवण करूनच चर्चा पूर्ण करून जायचे. त्यांची इच्छा होती की, शरद पवार यांच्या देखतच दोन्ही पक्ष एकत्र करायचे आहेत. या विषयावर जवळपास 8 - 10 वेळा बैठका झाल्या आणि बैठकीचे ठिकाण माझं घरच होतं. पहिल्या दोन-चार बैठकांत त्यांनी त्यांच्या भावनाच व्यक्त केल्या.

जयंत पाटील म्हणाले, 16 तारखेला माझ्या घरीच पक्षातील काही प्रमुख नेत्यांसह त्यांची बैठक झाली. यापूर्वीदेखील अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील आणि पक्षांच्या अध्यक्षांसह बैठक झाली. 16 रोजी सगळेच एकत्र होतो. त्यात ठरलं की, आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडीत लढू. निवडणुकीच्या निकालानंतर जयंत पाटील ठरवतील ती तारीख जाहीर करू. आम्ही 12 तारीख निश्चित केली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून आम्ही सहज गमतीत म्हटले की, आपण बारामतीला शरद पवार यांना भेटायला विमानाने जाऊ. आम्ही ज्याला फोन केला, तो म्हणाला की, ती धावपट्टी लहान आहे, माझे विमान काही तिथे उतरणार नाही. मग आम्ही गाडीने निघालो आणि सकाळी आठ वाजता पवार शरद पवार यांच्यासमोर बसलो. तिथे सविस्तर चर्चा झाली. 12 तारीख आम्ही सर्वांनी निश्चित केली.

सत्तेत जाणार होता का..?

तुम्ही सत्तेत जाणार होता का? या प्रश्नावर आ. जयंत पाटील म्हणाले, दोन्ही पक्ष एकत्र यावेत, हा त्यांचा आग्रह होता. त्यातील बरेच तपशील आहेत. पुढे त्याचाही खुलासा मी करेन. काहीवेळा सुप्रिया सुळे देखील उपस्थित असायच्या. चर्चा बऱ्यापैकी पुढे गेली होती. अजित पवार यांनी मला हेही सांगितले होते, की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि इतर त्यांच्या पक्षातील नेत्यांनादेखील याबाबत कल्पना दिली आहे. इतर नेत्यांच्या सहमतीबाबत अजित पवार म्हणाले होते की, मी जेव्हा निर्णय देतो, तेव्हा तो इम्प्लिमेंट होतो. त्यामुळे तुम्ही त्याविषयी चिंता करू नका. माझे सर्व सहकारी मी सांगेल त्याप्रमाणे निर्णय घेतील.

मंत्री होणार काय..?

तुमचं नाव आज अर्थमंत्री पदासाठी पुढे येत आहे, तुम्ही मंत्री होणार आहात का? या प्रश्नावर आ. पाटील म्हणाले, त्यांचा पक्ष आज तरी स्वतंत्र आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि काही प्रमाणात छगन भुजबळ त्यांच्या पक्षाचे निर्णय घेत आहेत. त्यामुळे त्या तिघांचा जो निर्णय असेल, त्याची अंमलबजावणी केली जात असेल. त्यांच्या पक्षाच्या निर्णयाबद्दल मी काही बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही.

अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा...

आ. जयंत पाटील म्हणाले, सन 1991 मध्ये अजित पवार विधिमंडळात आले. मी 90 साली निवडून गेलो. त्यानंतर विरोधी पक्षात असतानादेखील आम्ही सोबत बसायचो. त्यांच्या स्वभावाचे पैलू बारकाईने माहिती आहेत.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार..?

अजित पवार यांचा आग्रह होता, की आपण एकत्र होऊया. त्यांची अंतिम इच्छा पूर्ण करण्याची बुद्धी सर्वांना मिळो. गेल्या सात-आठ महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. आमच्या बाजूच्या सर्वांची सहमती आहे. या एकत्रित येण्याला कोणाचा विरोध नाही. उलट पाठिंबाच आहे, असे अजित पवार यांचे म्हणणे होते. त्यांची ही इच्छा पूर्ण होण्यासाठी कार्यकर्त्यांनीही आता पुढाकार घ्यायला हवा.

यावर मी भाष्य करणार नाही...

एवढ्या घाईगडबडीने सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणे योग्य आहे का? या प्रश्नावर आ. जयंत पाटील म्हणाले, हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. त्यावर मी काही भाष्य करू इच्छित नाही. त्यांच्या आमदारांच्या भावना काय आहेत, ते पाहून जर निर्णय घेतला, तर अजित पवार यांची इच्छा पूर्ण होईल. याबाबत पवार कुटुंबामध्ये तशी चर्चा झालेली दिसत नाही. अंत्यविधी झाल्यावर मी निघून आलो. त्यानंतर काय घडामोडी घडल्या, हे मला माहिती नाही.

सखोल चौकशी व्हावी...

अजित पवार यांच्ा विमान अपघाताबद्दल आ. जयंत पाटील म्हणाले, मला तेथील सरपंचांनी सांगितलं की, विमानातून फार मोठा आवाज येत होता. तो नेहमीच्या आवाजापेक्षा वेगळा होता. तांत्रिक बिघाड होता, अपघात कसा झाला, त्याला कोण जबाबदार आहे, यावर चौकशीअंतीच उजेड पडू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT