Jayant Patil 
सांगली

Jayant Patil : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने उसाचे एकरी दीडशे टन उत्पादन

आ. जयंत पाटील : पंचायत समितीमध्ये कार्यशाळा

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : ऊस शेतीत आधुनिक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी १५० टनांहून अधिक उत्पादन घेणे सहज शक्य आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि साखर कारखान्यांच्या समन्वयातून राबवण्यात येणाऱ्या विशेष प्रकल्पांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार जयंत पाटील यांनी केले.

जिल्हा परिषद व वाळवा पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते राजारामबापू पाटील व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त, तसेच कृषी पंधरवड्यानिमित्त आयोजित 'शेतकरी सन्मान सोहळा' आणि 'एकरी दीडशे टन ऊस उत्पादन कार्यशाळेत' ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील, सभापती सावित्री पाटील, वाळवा पंचायत समितीचे सभापती उदयसिंह पाटील, उपसभापती प्रकाश पाटील, जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील, कृषी विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार आणि तालुका कृषी अधिकारी इंद्रजीत चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी राज्य शासनाच्या विविध कृषी पुरस्कारांनी सन्मानित शेतकरी विनोद तोडकर (कासेगाव), अशोक खोत (वाळवा), प्रतीक पाटील (साखराळे), पंजाबराव पवार (रेठरे हरणाक्ष) आणि महिला गटातील शोभा पाखले (बोरगाव) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अमृत कलश महिला शेतकरी कृषी स्वयंसहाय्यता बचत गट (बोरगाव), अमृतधारा महिला उत्पादक गट (गाताडवाडी) यांच्यासह जिल्हा परिषदेच्या ११ गटांतील ७५ प्रयोगशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

संगीता पाटील म्हणाल्या, "जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विविध कृषी उपक्रमांमधून शेतकऱ्यांना नक्कीच नवी प्रेरणा मिळेल. कार्यशाळेत कृषी शास्त्रज्ञ समाधान सुरवसे यांनी एकरी १५० टन ऊस उत्पादनासाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञान, जलव्यवस्थापन व उत्पादनवाढीच्या विविध उपायांवर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा खादी व ग्रामोद्योग अधिकारी मिरजकर यांनी मधुमक्षिका पालनाचे व्यावसायिक महत्त्व, संधी व शासकीय योजनांची माहिती दिली. या प्रसंगी वाळवा तालुक्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांचे आकर्षक स्टॉल्स आणि कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते, ज्यास शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला.

प्रास्ताविक सभापती उदयसिंह पाटील यांनी केले. छाया माळी व रूपाली माळी यांनी सूत्रसंचालन केले, तर कृषी अधिकारी अभिजित घोरपडे यांनी आभार मानले. या वेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT