सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी विरोधी पक्षाने मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर विधानसभेत भाषण केले. हे सरकार म्हणजे ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ असे आहे. गल्लीत कितीही गोंधळ घातला तरी दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो, असा टोला त्यांनी लगावला.
ते म्हणाले, पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून आपण संबोधायचो. पुणे तिथे काय उणे असं आपण अभिमानाने म्हणायचो. मात्र आता असं म्हणावं लागतंय, पुणे जिथे फक्त घडतात गुन्हे. शहराची प्रचंड बदनामी होत आहे. गुन्हेगारांचा मोर्चा आता नागपूरकडे वळला आहे. सरासरीने तीन दिवसात एक खून शहरात घडत आहे. या टोळ्यांना कोण पोसते आहे, याचा खुलासा झाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या शहरात ही परिस्थिती आहे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे काय?
राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व व जबाबदार व्यक्ती आहेत. पण त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबद्दल सभागृहाची दिशाभूल केली होती. मात्र कोर्टाने सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीमुळेच झाला असल्याचे स्पष्ट केले आहे व संबंधित पोलिस अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. नाशिक येथील एका मोठ्या नेत्याचा सत्ताधारी गटातील एका पक्षात प्रवेश झाला आहे. विशेष बाब म्हणजे याच पक्षाने सहा महिन्यांपूर्वी या प्रवेश करणार्या व्यक्तीवर टीकेची झोड उठवली होती. ही व्यक्ती दाऊदचा साथीदार सलीम कुत्ता याच्यासोबत पार्ट्या करते, असा आरोप थेट सभागृहात केला गेला आणि सहा महिन्यानंतर लगेचच याच व्यक्तीला त्या सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश दिला गेला.