इस्लामपूर : भाजप पक्षात प्रवेश करायला मुळात मुख्यमंत्र्यांकडे अर्जच कोणी केला आहे? हे तुम्ही त्यांनाच विचारा. आता तुमचे 238 आमदार झाले आहेत. आता पक्षप्रवेशावर जास्त लक्ष न देता, जरा राज्य चालवण्याकडे लक्ष द्या, असा सल्ला राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आ. जयंत पाटील यांनी दिला.
आमदार जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘तुम्हाला जो प्रवेश अपेक्षित आहे, तो आमच्या मनात सध्या तरी नाही’, असे सूचक विधान केले होते. यावर जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, आता सत्ता असेल तिकडे जाण्याची प्रथाच पडली आहे. सत्तेतील तिन्ही पक्ष त्यासाठी गळ टाकूनच बसले आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये बरेच मोठे नेते आहेत, मी एकटाच नाही. त्यामुळे नेमके कोणते नेते भाजपमध्ये जाणार, हे तुम्हीच मुख्यमंत्र्यांना विचारा. मी तर काही त्यांच्याकडे अर्ज केलेला नाही. ते म्हणाले, राज्यासमोर बरेच प्रश्न आहेत. सरकारकडून अनेक चुका होत आहेत. राज्य व्यवस्थित चालवले, तर तुमचा पक्ष आणखीन मोठा होईल.
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालाबाबत जयंत पाटील म्हणाले, आता न्यायालयाने निकाल दिला आहे. अलीकडच्या काळात न्यायव्यवस्थेबाबत बोलणेही अवघड झाले आहे. जर यात काहीच नव्हते, तर इतके दिवस हा खटला का चालला? असा प्रश्न सामान्य जनतेलाही पडू शकतो.