सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेतील सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. आमदार पाटील यांनी 2008 मध्ये नेते मदन पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला बाजूला करण्यासाठी भाजपसह सर्व विरोधी पक्षांची महाविकास आघाडी तयार केली होती. यावेळी ते भाजपविरोधात आघाडी करण्याच्या प्रयत्नात आहेत. इच्छुकांना 10 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
सांगली जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 1999 मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्यावेळी आमदार जयंत पाटील, नेते आर. आर. पाटील, नेते विष्णुअण्णा पाटील राष्ट्रवादीमध्ये गेले. त्यानंतर काही दिवसातच मदन पाटील परत स्वगृही काँग्रेसमध्ये आले. त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिका, जिल्हा बँक, सांगली बाजार समिती आदी प्रमुख संस्थांवर सत्ता होती. त्यांचा शब्द अंतिम मानला जात होता.
2008 च्या महापालिका निवडणुकीत आमदार पाटील यांनी नेते संभाजी पवार यांच्यासह इतर पक्षांना बरोबर घेऊन काँग्रेसविरोधात महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी सांगलीचे शांघाय करू, मोनोरेल आणू, कवठेपिरान येथे विमानतळ उभारू... अशा अनेक घोषणा केल्या. लोकांनीही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महापालिकेत सत्तांतर घडवले. त्यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आल्याने जयंत पाटील यांचा प्रथमच सांगलीत प्रवेश झाला. लोक खासगीत जयंत जनता पार्टी असे त्यांच्या सत्तेला आजही म्हणतात.
पुढे काही महिन्यातच मिरज पॅटर्न उदयास आला. आमदार इद्रिस नायकवडी यांनी जयंत पाटील यांचे नेतृत्व मानले नाही. महाविकास आघाडी फुटली. 2013 च्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसची सत्ता महापालिकेत आली. इस्लामपूरचे पार्सल परत पाठवा, असे आवाहन माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी केले होते. त्याला सांगलीकरांनी प्रतिसाद दिला. पुढे 2018 च्या महापालिका निवडणुकीवेळी राज्यात भाजप-सेना युतीची सत्ता होती. त्याचा परिणाम येथील निवडणुकीवर झाला. महापालिकेत भाजपला बहुमत मिळाले.
भाजपचे 41 नगरसेवक निवडून आले. दोन अपक्षांनीही पाठिंबा दिला. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. काँग्रेसचे 19, तर राष्ट्रवादीचे 15 नगरसेवक निवडून आले होते. अडीच वर्षे भाजपने कारभार केला. मात्र 2021 ला महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपचे सात नगरसेवक फोडले. त्यात पाच जणांनी राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी यांना मतदान केले, तर दोन सदस्य अनुपस्थित राहिले. भाजपचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते आणि पालकमंत्री आमदार जयंत पाटील होते. त्यामुळे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर अडीच वर्षे सत्ता राहिली.
2023 पासून महापालिकेवर प्रशासक आहे. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी फुटून दोन स्वतंत्र पक्ष तयार झाले. अनेकजण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले. ज्या भाजपला बरोबर घेऊन काँग्रेसविरोधात आमदार पाटील यांनी 2018 मध्ये महाविकास आघाडी तयार केली होती, ती आता भाजपच विरोधात आहे. नगरपालिकांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आमदार जयंत पाटील ईश्वरपूर व आष्टा या ठिकाणी तळ ठोकून होते. आता त्यांनी सांगली महापालिका निवडणुकीत लक्ष घातले आहे. काय घडामोडी घडणार, निकाल काय लागणार हे येणाऱ्या काळात लवकरच स्पष्ट होणार आहे.