सांगली

Jat Wall Collapse: भिंत कोसळून सहाजणांचा मृत्यू

मोटेवाडीत मरगूबाई यात्रेतील भाविकांवर काळाचा घाला; 12 जण जखमी

पुढारी वृत्तसेवा

जत : मोटेवाडी (आसंगी तुर्क, ता. जत) येथे मरगूबाई यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांवर मंगळवारी सायंकाळी निसर्गाने भीषण घाला घातला. प्रचंड वाऱ्यामुळे शेडची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा भाविकांचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून या घटनेमुळे संपूर्ण जत तालुक्यासह सीमाभागात हळहळ व्यक्त होत आहे.

या दुर्दैवी घटनेत कोंडिबा राऊबा गेजगे (65, रा. दरीबडची), शंकर आबा लोखंडे (75, रा. पांडोझरी), मंगल भाऊसाहेब मोटे (60, रा. पांडोझरी), अरुण विजू गेजगे (14, रा. डोमनाळ, ता. विजयपूर), सोन्या लक्ष्मण चव्हाण (14, रा. डोमनाळ) आणि संगीता राम चौधरी (42 रा. टक्कळकी, ता. तिकोट, जि. विजयपूर) यांचा मृत्यू झाला.

मोटेवाडी येथील मरगूबाई मंदिर गावापासून साधारण दोन कि.मी. अंतरावर पांडोझरी रस्त्यावर आहे. येथे दर मंगळवार व शुक्रवारी यात्रेनिमित्त जतपूर्व भागासह कर्नाटकातील हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. मंगळवारी यात्रेनिमित्ताने भाविकांची मोठी गर्दी होती. सायंकाळी साडेचारच्या सुमारास परिसरात अचानक जोरदार वारे सुटले. वाऱ्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी भाविकांनी देवस्थानलगत असलेल्या शेडचा आसरा घेतला.

मात्र, वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने सुमारे 70 फूट लांबीच्या या शेडचे पत्रे उडाले आणि चिऱ्यांनी बांधलेली भिंत अचानक भाविकांच्या अंगावर कोसळली. भिंत कोसळताच भाविक ढिगाऱ्याखाली अडकले. ग्रामस्थांनी तातडीने जखमींना ढिगाऱ्याबाहेर काढले. यापैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. अन्य जखमींना खासगी वाहनांतून संख येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व जत येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान आणखी तिघांचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT