जत तालुक्यात तलावातील पाणीसाठा घटला 
सांगली

Sangli News : जत तालुक्यात तलावातील पाणीसाठा घटला

उन्हाळ्याच्या तोंडावर पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी टंचाईची भीती

पुढारी वृत्तसेवा

जत शहर : गेल्या काही दिवसांमध्ये तापमानात झालेल्या वाढीमुळे जत तालुक्यातील तलावांतील पाणीसाठा हळूहळू कमी होत चालला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जत तालुक्यातील विविध 27 तलावमधील व लघु पाटबंधारे प्रकल्पांमधील पाणीसाठा लक्षणीयरीत्या घटला आहे. अनेक तलावांमध्ये साठा 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. तालुक्यातील काही तलावांमध्ये तुलनेने समाधानकारक साठा असला तरी बहुतांश तलावांतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होताना दिसत आहे.

शेगाव क्रमांक एक तलावात 64.63 टक्के, वाळेखिंडी तलावात 58.92, बिरनाळ तलावात 52.95 आणि येळवी तलावात 51.51 पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. तसेच मध्यम प्रकल्प संखमध्ये 62.39 टक्के आणि सोरडी लघु पाटबंधारे तलावात 65.49 साठा असल्याने या प्रकल्पांमुळे काही प्रमाणात दिलासा आहे. कोसारी तलावात 26.09 टक्के, तिप्पेहळी तलावात 23.09, मिरवाड तलावात 28.61, गुगवाड तलावात 27.06, प्रतापूर तलावात 23.86 तर बिळूर तलावात केवळ 20.50 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

लघु पाटबंधारे तलाव तिकोंडी क्र. 1 ची स्थिती चिंताजनक असून येथे केवळ 2.44 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्या पाठोपाठ दरीबडची तलावात फक्त 3.65 टक्के साठा उरल्याने हे दोन्ही तलाव पूर्ण कोरडे पडू शकतात. या परिसरातील गावांना आता पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागण्याची शक्यता आहे. काही तलावांमध्ये 30 ते 40 टक्क्यांच्या दरम्यान साठा असून तिथेही पाणी जपून वापरण्याचे आव्हान आहे. बेळुंखी तलावात 30.93 टक्के खोजनवाडी 31.01, डफळापूर 31.46, रेवनाळ 33.02, जालीहाळ 37.53 आणि सिध्दनाथ तलावात 38.71 टक्के पाणीसाठा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT