Pudhari
सांगली

Sangli missing cases: जत तालुक्यात सहा महिन्यांत ५२ मुली, महिला बेपत्ता

महाभयंकरच - बलात्कार, अपहरण, हुंडाबळीमुळे मुली, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

जत : जत तालुक्यातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता, महिला बेपत्ता अशा घटना वारंवार घडतात. या मुली, महिला जातात तरी कोठे? गुन्हा नोंद होतो, त्याचे पुढे काय होते ? पोलिस तपासातून काय निष्पन्न होते? बेपत्ता मुली, महिला सापडतात का? किती टक्के आहे हे प्रमाण? जत तालुक्यात मुली, महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीय का? जतचे सर्वपक्षीय तमाम राजकीय नेतृत्व, पदाधिकारी, कार्यकर्ते करतात तरी काय?

जत आणि उमदी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत महिला, तरुणी आणि अल्पवयीन मुलींशी संबंधित गुन्ह्यांचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय बनले आहे. डिसेंबर २०२५ ते मे २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत बेपत्ता महिला-मुली, अपहरण, पोक्सो, बलात्कार, विनयभंग आणि हुंडाबळीच्या तब्बल ५२ घटनांनी महिला सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर आहे, ते स्पष्ट होते.

वळसंग, उमदी, माडग्याळ, शेगाव, मोटेवाडी, बिळूर, बाज, पांढरेवाडी, हळ्ळी, जत शहर, बेळोंडगी आदी गावांतील महिला, तरुणी आणि अल्पवयीन मुली बेपत्ता अथवा अपहरण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक प्रकरणांमध्ये घरातून बाहेर पडून परत न येणे, फूस लावून नेल्याचा संशय किंवा आमिष दाखवून अपहरण झाल्याचे आरोप आहेत.

विशेष म्हणजे बेपत्ता होणाऱ्या महिला व मुलींमध्ये १६ ते २२ वर्षे आणि २२ ते ३५ वर्षे या वयोगटांतील प्रमाण सर्वाधिक आहे. हा शिक्षण, रोजगार, वैयक्तिक आयुष्य आणि सामाजिक संक्रमणाचा टप्पा मानला जातो. त्यामुळे या घटनांमागे सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक किंवा वैयक्तिक कारणांचा संबंध असण्याची शक्यता असते.

काही उपाययोजना अशा

महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची जनजागृती मोहीम. शाळा-महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन. सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता. संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष. पालकांचा मुलांशी सतत संवाद. मुलांच्या हालचालींकडे लक्ष. विश्वासाचे वातावरण

वयोगट कोणता ?

बेपत्ता होणाऱ्या महिला व मुलींमध्ये १६ ते २२ वर्षे आणि २२ ते ३५ वर्षे या वयोगटातील प्रमाण सर्वाधिक असल्याचे पोलिस नोंदींमधून स्पष्ट होते.

जत, उमदी पोलिसांपुढे आव्हान

महिला व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून न पाहता गंभीर सामाजिक समस्या म्हणून बघायला हवे. ही स्थिती सामाजिक आरोग्याचा आरसा आहे. जत, उमदी पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. ते नेमके काय करतात? तपास सुरू आहे... याच्या पलीकडे जाऊन जत, उमदीचे पोलिस काही करणार का? रिझल्ट देणार का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT