jat rajaram bapu patil sugar mill name change:
जत येथील राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील कमानीवर काल रात्री अज्ञातांनी नामकरण करत नवीन फलक लावला आहे. 'राजाराम बापू पाटील' हे नाव बदलून आता तिथे ‘राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ असा फलक झळकला आहे. या अचानक झालेल्या नामकरणामुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
काही दिवसांपूर्वीच आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतमध्ये बोलताना जयंत पाटलांना उघड आव्हान दिले होते. "या वर्षी जतच्या राजाराम बापू कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही. हा कारखाना त्वरित सभासदांच्या ताब्यात द्यावा," असा इशारा त्यांनी दिला होता. हा कारखाना काही वर्षांपासून जयंत पाटील यांच्या ताब्यातील राजाराम बापू सहकारी कारखान्याच्या माध्यमातून चालवला जातो. पडळकरांच्या या इशाऱ्यानंतर लगेचच ही नामकरणाची घटना घडल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना गोपीचंद पडळकर यांनी नाव बदलण्याच्या कृतीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. 'हा कारखाना सभासदांच्या पैशातून उभा राहिला असून, जयंत पाटलांनी तो डापला आहे. तालुक्यातील २२ हजार शेतकरी सभासदांची भावना अत्यंत तीव्र आहे की हा कारखाना सभासदांचा झाला पाहिजे,' असे पडळकर म्हणाले. शेतकऱ्यांनीच तीव्र भावना व्यक्त करत हे पाऊल उचलले असावे, असा कयासही त्यांनी व्यक्त केला. तसेच, सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण रस्त्यावरची आणि कायदेशीर लढाई लढण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सभासदांना कारखाना परत मिळावा या मागणीसाठी सुरु असलेल्या या आंदोलनामुळे जयंत पाटील गट आता काय भूमिका घेतो याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नामकरणामुळे पडळकर विरुद्ध जयंत पाटील हा वाद आता आणखी पेटण्याची शक्यता आहे.