सांगली : दारू देण्याच्या आमिषाने शेकोटीपासून उठवून नेले व दारू दुकानासमोर पैसे नसल्याचे सांगितल्याने दोघांनी विकास मलकारी टकले (वय 22, रा. उमदी, ता. जत) याचा खून केल्याचे आता समोर आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणने 48 तासात या खुनाचा छडा लावत दोघा सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. रवींद्र आबासाहेब बंडगर (वय 30) आणि विराज संजय पांढरे (20, दोघे रा. शिवाजी पेठ, जत) अशी त्यांची नावे आहेत.
जतमध्ये झालेल्या खुनाचा छडा लावण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांनी दिले होते. त्यानुसार सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक याबाबत तपास करीत होते.
मृत विकास हा दि. 18 रोजी आईसमवेत जत येथील श्री यल्लमा यात्रेत गेला होता. त्यानंतर त्याने आईला उमदी येथे घरी पाठवून तो यात्रेमध्येच थांबला होता. याचदरम्यान संशयित रवींद्र बंडगर आणि विराज पांढरे हे दोघेही दि. 18 रोजी रात्री यात्रेत फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी दोघांना त्यांचा मित्र भेटला. दोघांनी त्याला दारू पाजण्याची विनंती केली. त्यानुसार त्याने दोघांना दारू पाजली. रात्रीची वेळ असल्याने तिघेही दारू पिल्यानंतर जतमध्ये असणाऱ्या एका ठिकाणी शेकोटी पेटवून बसले होते. काही वेळानंतर बंडगर आणि पांढरे या दोघांना दारू पाजणारा त्यांचा मित्र त्या ठिकाणाहून निघून गेला.
त्यानंतर मात्र विकास टकले हाही दारू पिऊन त्या ठिकाणाहून निघाला होता. बंडगर आणि पांढरे हे दोघे शेकोटी करून बसल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्या दोघांची ओळख नसतानाही विकास टकले हा दोघांजवळ जाऊन शेकत बसला. शेकोटीजवळ बसल्यानंतर त्यांच्यात ओळख झाली. तिघेही दारू प्यायले असल्याने पुन्हा दारू पिण्याबाबत चर्चा सुरू झाली. विकास टकले याने दोघांकडे दारूची मागणी केली. त्यावेळी दोघांनी ‘आमच्याकडे पैसे नाहीत’ असे सांगितले. त्यावेळी विकास टकले याने ‘माझ्याकडे पैसे आहेत, चला मी दारू पाजतो’ असे सांगितले. त्यामुळे तिघे एकाच दुचाकीवरून दारूच्या दुकानासमोर गेले.
दारूच्या दुकानासमोर गेल्यानंतर विकास टकले याने बंडगर आणि पांढरे या दोघांना ‘माझ्याकडे पैसे नाहीत’ असे सांगितले. त्यावेळी मात्र पैसे नसतानाही दारू पाजतो असे सांगून शेकोटीपासून उठवून आणल्याचा दोघांना राग आला. त्यापैकी एकाने विकास याला मारहाण केली. त्यावेळी विकास याने अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे दोघांना राग अनावर झाला. दोघांनी त्याला पुन्हा दुचाकीवर बसविले व जतमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावरांच्या बाजार आवारात दि. 19 रोजी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास घेऊन गेले. त्या ठिकाणी तिघांमध्ये जोरदार वाद झाला.
यावेळी विकास याने दोघांना अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे दारूच्या नशेत असणाऱ्या दोघांनी त्याचे कपडे काढले. यावेळी मात्र विकास पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. दोघांनी त्याला दगड फेकून मारला. त्याच्या डोक्यात दगड लागल्याने विकास जखमी झाला. त्यानंतर मात्र दोघांनी त्याचे डोके दगडाने ठेचून त्याचा निर्घृणपणे खून केला व दुचाकीवरून पलायन केले. सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे दोघांचा शोध घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषणने दोघांना अटक केली. पुढील तपासासाठी दोघांना जत पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेले दोघे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध मारामारी आणि आर्म ॲक्टचे गुन्हे दाखल आहेत. तपासात स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे, सहायक निरीक्षक पंकज पवार, हवालदार सोमनाथ गुंडे, संदीप नलवडे, नागेश खरात, अनिल कोळेकर, अमर नरळे, सागर लवटे, अमिरशा फकीर, सागर टिंगरे, दरिबा बंडगर, संदीप गुरव, सतीश माने, मच्छिंद्र बर्डे, आमसिद्धा खोत, केरबा चव्हाण, विक्रम खोत यांनी सहभाग घेतला.