Crime News Pudhari Photo
सांगली

Sangli Crime | जत : गोंधळेवाडीत सशाची शिकार करून मुंडके पुरले

दाेघांना अटक : वन विभागाचा छापा; शिकारीचे साहित्य जप्त, १० ते १२ फरार संशयितांचा शोध

पुढारी वृत्तसेवा

जत : जत तालुक्‍यातील गोंधळेवाडी येथे वन्यप्राणी सश्याची बेकायदा शिकार करून त्याचे मुंडके गावातील चौकातील झेंडा कट्ट्याजवळ पुरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वनविभागाने तत्परतेने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यात गावातील आणखी १० ते १२ जणांचा थेट सहभाग असून, सध्या त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी (३० जून) कर्नाटकातील बेंदूर (कर) सणानिमित्त गोंधळेवाडी येथील पांडुरंग रामन्ना खोत, विजय पांडुरंग खोत आणि इतर १० ते १२ जणांनी गाव परिसरातील माळरानावर शिकारीचा बेत आखला होता. या सर्वांनी कुत्र्यांच्या साहाय्याने व जाळे लावून एका सश्याची शिकार केल्याचा आरोप आहे. शिकार केल्यानंतर हा ससा गावात आणण्यात आला. त्यानंतर त्याचे मुंडके छाटून गावातील मुख्य चौकातील झेंडा कट्ट्याखाली खड्डा करून पुरल्याचे वनविभागाच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

या गंभीर घटनेची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार जतचे वनपरिक्षेत्र अधिकारी निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी गणेश दुधाळ, वनपरिमंडळ अधिकारी राजेंद्र पाटील, वनरक्षक भैरवनाथ यादव आणि वनरक्षक पांढरे यांच्या पथकाने तातडीने गोंधळेवाडीत धाड टाकली. वनविभागाच्या या पथकाने शिकार केलेला ससा आणि शिकार करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त केले असून, दोन्ही संशयित आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आणि फरार असलेल्या सर्व आरोपींविरुद्ध भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT