कराड : दोन ते तीन दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या युवतीने लग्नापूर्वीच कृष्णा नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. मंगळवारी सायंकाळपर्यंत संबंधित मुलीचा शोध लागला नव्हता.
कल्पना बाळाप्पा वाघमारे (वय 26, रा. वाखाण रोड कराड, मूळ रा. जत, जि. सांगली) असे या युवतीचे नाव आहे. सोमवारी रात्री कल्पना दुचाकीवरून कृष्णा पुलावर आली आणि तिने थेट नदीत उडी मारली. हे पाहून पुलावरील लोकांनी आरडाओरडा केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित युवतीशी लग्न ठरलेला मुलगा, नातेवाईक घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी तरुणीची बॅग आणि साहित्य दाखविल्यानंतर कल्पनानेच नदीत उडी मारल्याचं स्पष्ट झाले. दरम्यान, कल्पना एका खाजगी रुग्णालयात नोकरी करत होती. तिच्या बॅगमध्ये पर्स, ओळखपत्र आणि इतर साहित्य होतं.
पोलिसांनी एनडीआरएफ टीमला बोलावले आणि स्थानिक मच्छीमारही मदतीला आले. पण अंधारामुळे शोध मोहिम थांबवण्यात आली होती. मंगळवारी सकाळी पुन्हा शोध मोहिम घेण्यास पोलिसांनी सुरूवात केली. मात्र कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदी पात्रात पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने शोधकार्यात अडथळे निर्माण होत होते. पोलिसांच्या दोन टिमने नदीपात्राच्या बाजूने टेंभू प्रकल्पापर्यंत शोध घेतला. मात्र मंगळवारी सायंकाळपर्यंत कल्पनाचा काही शोध लागला नाही. पोलिसांनी जवळपासच्या सर्व गावातील पोलिस पाटील यांना त्या अनुषंगाने सूचना केल्या आहेत.