सांगली : मराठा समाजाच्या मान्य होणार्या मागण्या यापूर्वीच मान्य केलेल्या आहेत. पण ज्या मागण्या मान्य होऊ शकत नाहीत, त्या मागण्यांसाठी मनोज जरांगे यांचे मुंबईत आंदोलन सुरू आहे. सर्व मराठा समाजाला ‘कुणबी’मध्ये रूपांतरित करणे हे कायद्यात बसणार नाही, ते न्यायालयात टिकणार नाही, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
मंत्री चंद्रकांत पाटील शनिवारी सांगली दौर्यावर आले होते, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, कुणबी नोंदी शोधण्यासाठी राज्य सरकारने न्या. संदीप शिंदे समिती स्थापन केली. या समितीला मुदतवाढ दिली. राज्यात 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या. मराठवाड्यात 10 लाखांपेक्षा जास्त कुणबी नोंदी सापडल्या आहेत. एका नोंदीवर सरासरी 10 दाखले तयार होतात. कुणबी नोंद आढळून आलेल्या मराठा समाजबांधवांना ओबीसी आरक्षणाचा लाभ होत आहे. मात्र सरसकट मराठा समाजाला ‘कुणबी’ दाखला देणे, अशी तरतूद नाही. कायद्यात ते बसत नाही. सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयामध्ये म्हटले आहे की, अशी एखादी संपूर्ण जात रूपांतरित करणे कायद्यात बसत नाही. त्यामुळे सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखला द्या, ही मागणी न्यायालयात टिकणार नाही.
उच्च शिक्षणातील प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत 3 सप्टेंबर होती. मात्र जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी वेळ लागतो हे पाहून 6 महिने मुदतवाढ दिली आहे. मराठा समाजाच्या अशा ज्या प्रॅक्टिकल मागण्या आहेत, त्या मान्य करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन सुरू केले आहे. त्याऐवजी जरांगे यांनी व्यावहारिक मागण्यांवर बोलणे गरजेचे आहे. तसे न करता त्यांनी मुंबई सोडणारच नाही, असे म्हटले, तर राज्य सरकार त्यांना जबरदस्तीने अटक करणार नाही. पण मुंबई ही चोवीस तास धावणारी आहे. आंदोलनामुळे मुंबईवासियांना अडचण, त्रास व्हायला नको. सर्वसामान्य मुंबईकरांचा दोष काय? त्यांना अडचण कशासाठी करायची?, असा प्रश्नही मंत्री पाटील यांनी उपस्थित केला.
एकनाथ शिंदे यांनी खोटे आश्वासन दिले नाही : पाटील
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला खोटे आश्वासन दिले नाही. जे जे लिहून दिले, ते ते त्यांनी पूर्ण केलेले आहे, असे उत्तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका प्रश्नावर दिले. जरांगे यांच्या पाठीमागे कोण आहे?, या प्रश्नावर मंत्री पाटील म्हणाले, पाठीमागे कोणी असले तरी तसे म्हणणार नाही. मी कोणावरही आरोप करणार नाही.