सांगली : दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष व राज्य जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाच्या मुख्य कार्यालयात त्यांचे स्वागत करण्यात आले. पक्षप्रवेशावेळीच त्यांची भाजप जैन प्रकोष्ठच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
मुंबईत भाजप प्रवेश सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सुरेश खाडे, भाजप जैन प्रकोष्ठाचे राज्य अध्यक्ष संदीप भंडारी, प्रशांत गौंडाजे आदी उपस्थित होते. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, भुदरगड व शिरोळ भागातून आलेले शेकडो कार्यकर्ते आणि जैन समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, रावसाहेब पाटील यांच्यासारख्या अनुभवी, समाजाभिमुख नेतृत्वाच्या भाजप प्रवेशामुळे पक्ष अधिक बळक होईल. त्यांच्या कार्यास पक्ष व शासनाकडून संपूर्ण पाठबळ दिले जाईल. पाटील म्हणाले, आजवर केलेल्या सामाजिक कार्याला आता पक्षाचे मोठे व्यासपीठ मिळाले आहे. हे कार्य अधिक जोमाने, व्यापक स्तरावर आणि समाज हितासाठी करत राहणार आहे. या कार्यक्रमात संदीप भंडारी यांनी जैन समाजासाठी भाजपकडून राबवण्यात येणार्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच, अनेक मान्यवर जैन समाज कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली.