Itkare house fire incident: इटकरेत दुमजली घर आगीत जळून खाक Pudhari
सांगली

Itkare house fire incident: इटकरेत दुमजली घर आगीत जळून खाक

इटकरे (ता. वाळवा) येथील श्रीपती अण्णा माने व बाबासाहेब अण्णा माने या शेतकरी कुटुंबातील दोन भावांच्या राहत्या घरास सोमवारी दुपारी आग लागली

पुढारी वृत्तसेवा

इटकरे : इटकरे (ता. वाळवा) येथील श्रीपती अण्णा माने व बाबासाहेब अण्णा माने या शेतकरी कुटुंबातील दोन भावांच्या राहत्या घरास सोमवारी दुपारी आग लागली. गावातील युवकांनी व अग्नीशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. आगीत संसारोपयोगी साहित्य, पैसे व दागिने, गहू, ज्वारी, भुईमूग शेंगा, सोयाबीन जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी, गावाच्या मध्यभागी भरवस्तीत माने बंधूंचे जुन्या पद्धतीचे दोन मजली कौलारू घर होते. होळीदिवशी स्वयंपाक करून घरातील सर्वजण शेतात गेले होते. दुपारी दोनच्या सुमारास घरातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना लोकांनी पाहिले. शेजारील ग्रामस्थांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेऊन दुमजली घराला लागलेली आग पाणी मारून आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. विश्वास कारखाना, ईश्वरपूर व आष्टा नगरपरिषदेच्या अग्निशमन पथकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. मात्र, घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य, धान्य, पैसे, दागिने, सागवानी दरवाजे, फळ्या, महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. नवीन घर बांधकामासाठी ठेवलेली साधारण साडेसात लाख रुपये रोख रक्कम, पाच तोळे सोने व इतर साहित्य, जळाले.

आगीची माहिती मिळताच गावकामगार तलाठी अनिरुद्ध टिके, ग्रामसेवक धनाजी गुरव यांनी पंचनामा केला. आमदार सत्यजित देशमुख, जि. प. सदस्य अभिजित पाटील, जि. प. सदस्या साईतेजस्वी देशमुख, पंचायत समिती सदस्य प्रदीप कांबळे, अशोक पाटील, सरपंच संपत कांबळे, अमित मलगुंडे, शामराव पाटील, नंदकुमार पाटील, रामचंद्र पवार, अमोल पाटील यांनी या कुटुंबाची भेट घेऊन आधार दिला. घराला आग कशामुळे लागली, हे मात्र समजू शकले नाही. कुरळप पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT