इस्लामपूर : ईश्वरपूर नामांतराचा विजयोत्सव सुरू असतानाच आता शहरात उरुण नावासाठी नवा वाद सुरू झाला आहे. त्यामुळे ईश्वरपूर नामांतराचा प्रस्ताव पुन्हा रखडणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. या नव्या वादावर आता सरकार काय तोडगा काढते ते पाहावे लागेल.
इस्लामपूर शहराची उरूण-इस्लामपूर अशीच ओळख आहे. त्यामुळे ‘ईश्वरपूर’ऐवजी ‘उरूण ईश्वरपूर’ असेच नामकरण करावे, अशी मागणी उरूण परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकार्यांकडे केली आहे. राज्य सरकारने इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर असे बदलण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. पण प्रस्तावात जोड शहर असलेल्या उरूण शहराचा उल्लेख नाही. त्यामुळे उरूण परिसरातील नागरिकांनी याबाबत आवाज उठविला आहे. इसवीसनाच्या दुसर्या शतकापासून उरूण शहराचा उल्लेख आढळतो, तर सोळाव्या शतकानंतर इस्लामपूर शहराचा उल्लेख आढळतो. ही दोन्ही शहरे एकत्रच वसलेली आहेत. त्यामुळे या शहरांना जोड शहर म्हणून उरूण-इस्लामपूर अशीच ओळख आहे. त्यामुळे उरूण ईश्वरपूर असेच नामकरण करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीमुळे ईश्वरपूर नामांतरानंतर विजयोत्सव केलेल्या महायुतीच्या नेत्यांची आता चांगलीच गोची झाली आहे. यावर आता काय तोडगा निघतो ते पाहावे लागेल. या नव्या मागणीमुळे गेली अनेक वर्षे रखडलेला नामांतराचा प्रस्ताव पुन्हा रखडणार नाही तर ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आ. सदाभाऊ खोत म्हणाले, इस्लामपूर व उरूण हे दोन वेगवेगळे सजे आहेत. इस्लामपूर हे नाव बदलण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे उरूण हे नाव तसेच राहणार आहे. ते बदलण्याचा प्रश्नच येत नाही. उरूण परिसरातील नागरिकांच्या भावनेचा आदर राखत उरुण ईश्वरपूर असेच शहराचे नाव राहील. यात राजकारण आणण्याची गरज नाही.
राज्यात उरुण इस्लामपूर या नावानेच शहराची ओळख आहे. नामांतरानंतर आता उरूण हे नाव पुसले जाणार आहे. ईश्वरपूर नामांतराचा विजयोत्सव करणार्या नेत्यांनी याबाबत आपली नेमकी भूमिका स्पष्ट करायला हवी.शहाजी पाटील, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष