सांगली

Sangli News : ईश्वरपूर झरी नाका चौकात जलवाहिनीला गळती

तातडीच्या दुरुस्तीची नागरिकांची मागणी; शहराच्या पश्चिम भागाचा पाणीपुरवठा धोक्यात येणार

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : नव्याने विकसित झालेल्या पेठ- ईश्वरपूर रस्त्यावरील बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या झरी नाक्याजवळील चौकात मोठी समस्या निर्माण झाली आहे. नुकतेच काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याच्या खाली गेलेल्या पिण्याच्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनला गळती लागल्याने सर्व पाणी रस्त्यावरून वाहताना दिसत आहे. या गळतीमुळे केवळ रस्त्याची अवस्था खराब होत नसून पिण्याचे पाणीही मोठ्या प्रमाणावर वाया जात आहे.

सदर पाईपलाईन ही शहराच्या पश्चिम भागातील पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून सध्या जरी गळतीचे प्रमाण कमी दिसत असले, तरी भविष्यात ती अधिक वाढण्याची शक्यता आहे. कारण या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. विशेषतः अवजड वाहनांची वर्दळ अधिक असल्याने रस्त्याखालील पाईपलाईनवर अतिरिक्त ताण येत असून गळती वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही गळती दुरुस्त करण्यासाठी नव्याने काँक्रिट केलेला रस्ता पुन्हा खुदाई करून पाईपलाईन दुरुस्त करावी लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विलंब झाल्यास समस्या अधिक गंभीर होऊ शकते. सध्या शहरातील अनेक भागात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असताना, अशा प्रकारे पिण्याचे पाणी वाया जाणे ही अत्यंत चिंताजनक बाब ठरत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालून संबंधित ठिकाणी आवश्यक खुदाई करून पाईपलाईनची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. मोठी गळती होण्यापूर्वीच उपाययोजना केल्यास पाणी वाचेल, तसेच भविष्यातील मोठे नुकसान टाळता येईल, असे मत स्थानिक नागरिक व वाहनचालक व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT