आठवडा बाजारावरून इस्लामपुरात राजकारण तापले  
सांगली

Sangli News : आठवडा बाजारावरून इस्लामपुरात राजकारण तापले

विक्रेत्यांचा नगरपरिषदेवर मोर्चा : फक्त गुरुवारचा बाजार स्थलांतरित करण्याचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : येथील आठवडी बाजाराच्या स्थलांतरास विरोध करत भाजीपाला विक्रेत्यांनी सोमवारी नगरपालिकेवर मोर्चा काढला. व्यापाऱ्यांचा विरोध पाहता रविवारचा बाजार आहे त्याच ठिकाणी व मार्केट यार्ड परिसरात, तर गुरुवारचा बाजार अंबिका उद्यान परिसरात भरवण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला. मात्र हा बाजार वाहतुकीला अडथळा न करता भरवण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.

शहरात भाजी मार्केट इमारतीचे काम सुरू असल्यामुळे गुरुवारी व रविवारी भरणारा आठवडा बाजार तहसील कार्यालयासमोरील चौकात रस्त्यावरच भरत होता. यामुळे या परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. तसेच तेथील व्यावसायिकांनाही या बाजाराचा फटका बसत होता. त्यामुळे व्यापारी संघटनेने हा बाजार स्थलांतरित करण्याची मागणी केली होती. त्यामुळे नगरपालिकेने हा बाजार अंबिका उद्यान परिसरात भरवण्याचा निर्णय घेतला होता. याला काही स्थानिक भाजी विक्रेत्यांनी विरोध केला.

नगरपालिका बाजार स्थलांतरित करण्याबाबत ठाम असल्याने सोमवारी भाजपचे नेते विक्रम पाटील, मंडल अध्यक्ष संदीपराज पवार, विजय पवार, मानसिंग पाटील, नरेंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांनी नगरपालिकेवर मोर्चा काढला. पोलिसांनी हा मोर्चा नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरच अडवला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. त्यानंतर विक्रम पाटील, विजय पवार, मानसिंग पाटील व व्यापारी प्रतिनिधी तसेच नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ, राष्ट्रवादीच्या गटनेत्या प्रा. अरुणादेवी पाटील तसेच नगरसेवक संग्रामसिंह पाटील, सुभाष सूर्यवंशी, शुभांगी शेळके, डॉ. संग्राम पाटील व सत्ताधारी नगरसेवकांची बैठक होऊन यावर तोडगा काढण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT