ईश्वरपुरात विद्यार्थ्यांचा एल्गार 
सांगली

Student  Protest : विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणार्‍यांना माफी नाही

ईश्वरपुरात विद्यार्थ्यांचा एल्गार; सच्चे दिन कधी येणार?

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : आई-वडिलांनी रक्ताचे पाणी करून आम्हाला शिकवले आहे. आमच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना आम्ही कधीही माफ करणार नाही, असा इशारा विद्यार्थ्यांनी येथील आंदोलनावेळी दिला. नीट पेपरफुटीप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

दिल्लीतील अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा व जंतर-मंतर येथे आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधासाठी ईश्वरपूर येथे सर्व विद्यार्थी संघटना, पुरोगामी संघटनांसह समविचारी पक्ष, सामाजिक संघटनांच्यावतीने पंचायत समितीपासून तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास पंचायत समिती परिसरातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा शहरातील झरीनाका, आझाद चौक, गांधी चौक, यल्लमा चौक यामार्गे तहसील कार्यालय परिसरात आला.

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संघर्ष करून रस्त्यावर उतरावे लागणे, ही लोकशाहीसाठी शोकांतिका आहे. एका परीक्षेचेही पारदर्शक नियोजन करता येत नसेल, तर सरकारने त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. बंदोबस्तासाठी पोलिस उभा करण्याऐवजी विद्यार्थ्यांशी चर्चा करा. ‘अच्छे दिन आणतो’ म्हणणार्‍या लबाड केंद्र सरकारने आता ‘सच्चे दिन’ तरी आणावेत.

यावेळी धनाजी गुरव म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा इंग्रजांच्या बाजूने होता. संघाच्या विचारांच्या भाजप सरकारने रेल्वे, सरकारी विमान कंपन्या विकल्या, आरक्षण रद्द केले. आता, प्राथमिक शाळा, विद्यालये बंद करायची आहेत. गरिबांचा शैक्षणिक हक्क हिरावून घ्यायचा आहे. आता, संविधान मानणारे सरकार देशात आणले, तरच शिक्षण व्यवस्था टिकेल. आ. सदाभाऊ खोत हेसुद्धा आरएसएसचे हस्तक झाले आहेत. त्यामुळे ते संघासारखे बोलू लागले आहेत. यावेळी बी. जी. पाटील, वंदना कांबळे यांच्यासह विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT