Jayant Patil 
सांगली

Jayant Patil : जयंतरावांच्या राजकीय भूमिकेकडे मतदारसंघाचे लक्ष!

एनडीए; भाजप, की संघर्षातून कणखर विरोधक म्हणून भूमिका...

पुढारी वृत्तसेवा

अशोक शिंदे

ईश्वरपूर : राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडीमुळे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आ. जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे मतदार संघाचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने जयंत पाटील काय भूमिका घेतात, याची कार्यकर्त्यांना उत्सुकता लागली आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा होत्या. मात्र या अफवा असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षच एनडीएसोबत सत्तेत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याआधी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा होती. नुकतेच भाजपचे नेते विनोद तावडे व आ. जयंत पाटील यांची भेट झाल्याची चर्चा आहे. या चर्चेमुळे जयंत पाटील हे सत्तेत जाणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

सत्ता आली... मात्र विकास कामांना निधी नाही...

ईश्वरपूर, आष्टा नगरपालिकेबरोबरच वाळवा पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर सत्ता आणण्यात जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. पालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांना विकास कामांची दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी पालिकेला भरीव निधीची गरज आहे. मात्र राज्य शासनाकडून विरोधकांना निधीच मिळत नसल्याच्या आधीच तक्रारी सुरू आहेत. निधीच मिळाला नाही, तर मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण कशी करायची, असा प्रश्नही जयंत पाटील यांच्यासमोर आहे. त्यामुळे एनडीएसोबत सत्तेत जाण्याची राष्ट्रवादी पक्षाची चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे.

नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात जयंत पाटील यांनी शहरातील सुधारित पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार योजना यासाठी राज्य शासनाने निधी मंजूर करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, तर दुसर्‍या बाजूला विरोधकांची कणखर भूमिका बजावताना याच अधिवेशनात जयंत पाटील यांनी अनेक प्रश्नांवर सत्ताधार्‍यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जयंत पाटील विकास कामांसाठी सत्तेसोबत जाणार, की विरोधात राहून विरोधकांची कणखर भूमिका पार पाडणार, ते लवकरच स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी जयंत पाटील यांनी आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे.

भूमिका गुलदस्त्यात...

आ. जयंत पाटील हे सलग आठ वेळा म्हणजे साधारणत: ४० वर्षांपासून या मतदारसंघावर पकड ठेवून आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तसेच महायुतीतील अनेक नेत्यांबरोबर चांगले संबंध राहिले आहेत. सत्तेच्या वळचणीला जयंतराव गेलेच, तर राज्याचा नऊवेळा अर्थसंकल्प मांडलेल्या या नेत्याकडे अर्थमंत्री पद दिले जाऊ शकते; अशीही अटकळ समर्थकांकडून बांधली जाते. अर्थात सत्तेच्या या वळचणीला या परिसरातून अनेक मंडळी नव्याने याआधीच गेली आहेत. त्या सर्वांना जयंतरावांची सत्तेतील संभाव्य एन्ट्री मानवणार नाही. तूर्तास विकास कामांच्या निधीसाठी जयंत पाटील यांनी सत्तेसोबतच जावे की जाऊ नये, याबाबत उलटसुलट मतप्रवाह आहेत. विरोधात राहूनही ते निधी आणू शकतात, अशी आशा कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे भविष्यात जयंत पाटील काय भूमिका घेतात तेही पाहावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT