इस्लामपूर : गेल्या काही महिन्यांपासून इस्लामपूर पोलिसांनी डीजे, लेसर बंदीसाठी कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव ध्वनिप्रदूषणमुक्त झाला. गावा-गावांत पारंपरिक वाद्यांवर भर देण्यात आला. याचे नागरिकांतून स्वागत झाले. ग्रामपंचायतींनी पत्रे देऊन इस्लामपूर पोलिसांचे अभिनंदन केले.
इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत इस्लामपूर शहरासह 41 गावे येतात. गेल्या 5-6 महिन्यांपासून इस्लामपूर पोलिस ठाण्यानेे मोठ्या आवाजातील डीजे, लेसर लाईट याच्याविरोधात कडक कारवाईला सुरुवात केली. सण, जयंती, मिरवणुका, लग्न, वरात आदी कार्यक्रमात लावल्या जाणार्या मोठ्या आवाजातील डीजे, लेसर लाईट यावेळी कारवाईचा बडगा उगारला. डीजे चालक, कार्यक्रम घेणार्यावर गुन्हे दाखल केले.
पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर येथे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या उपस्थितीत प्रशासकीय अधिकारी, पोलिस पाटील, गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक घेतली. त्यानंतर इस्लामपूर पोलिसांनी गावा-गावात मंडळाच्या बैठका घेतल्या. ध्वनी प्रदूषण, लेसर लाईटचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करण्यात आली. कायद्याचा भंग करणार्या मंडळावर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. परिणामी, पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 41 गावांतील 583 सार्वजनिक मंडळांनी लेझीम पथक, ढोल- ताशा पथक, सनई आदी पारंपरिक वाद्यात मिरवणुका काढल्या.
डीजेमुक्त उत्सवाचे नागरिकांतून स्वागत होत आहे. कोणत्याही कार्यक्रमावेळी ध्वनिप्रदूषण करणार्या आयोजक, डीजे चालकावर गुन्हे दाखल केले जाणर; कोणाचीही गय केली जाणार नाही.संजय हारुगडे पोलिस निरीक्षक, इस्लामपूर पोलिस ठाणे