इस्लामपूर : येथील शेतमजूर हानिफाबी मदनसाब मुल्ला (वय 65, रा. साईनगर) यांचा खून दागिन्यांसाठी केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी मुवाज इलाही मुलाणी (21, रा. ईदगाह मैदानाजवळ, इस्लामपूर) याला इस्लामपूर पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने 24 तासात अटक केली. न्यायालयाने मुवाज याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
मंगळवारी सायंकाळी कापूरवाडी येथील नरसोबा मंदिरजवळील ओढ्यामध्ये हानिफाबी यांचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी कापूरवाडी येथील ओढापात्रात व आजुबाजूच्या परिसरात रात्रभर शोध घेतला. मात्र, कोणताही पुरावा सापडला नव्हता. बुधवारी खबर्या व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित मुवाज मुलाणी याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
हानिफाबी व मुवाज यांची ओळख होती. मंगळवारी सकाळी हानिफाबी यांना, शेतात काम आहे, असे सांगून मुवाज याने बोलावून घेतले. साईनगर येथून आडबाजूने चालत त्यांना कापूरवाडी येथील ओढापात्रापाजवळ नेले. तेथे मुवाज याने अचानक दगड उचलून पुढे चाललेल्या हानिफाबी यांच्या डोक्यात घातला. हानिफाबी या खाली पडल्या. मुवाज याने त्यांच्या तोंडावर, डोक्यात दगडाने मारहाण केली. त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या असता, त्यांचे सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले.
मुवाज हा हानिफाबी यांना घेऊन आडबाजूने, शेतातून पायवाटेने गेला होता. मात्र, खुनानंतर मुवाज हा पेठ-इस्लामपूर रस्त्याने घराकडे आला. बुधवारी मुवाज घरीच होता. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांच्या पथकाने मुवाज याला अटक केली.
संशयित मुवाज हा चैनीखोर आहे. त्याने पैशासाठी चोर्या केल्याच्या तक्रारी होत्या. मात्र, घरच्यांनी प्रकरणे मिटवली होती. गुरुवारी सायंकाळी पोलिस मुवाजला तपासासाठी घेऊन निघाले होते. त्यावेळी मुवाज याची आई, नातेवाईक पोलिस ठाण्याच्या आवारात आले. मुवाज याला बघताच त्याच्या आईने शिव्यांची लाखोली वाहिली. त्याच्या अंगावर धावून जात रागाने त्याच्या श्रीमुखात लगावल्या.