ईश्वरपूर पालिका 
सांगली

Sangli News : ईश्वरपुरात बाजारातील कर वसुलीच्या ठेक्यास विरोध

पालिका सभेत बहुमताने ठराव मंजूर : नव्या अंगणवाड्या विरुगळा केंद्र उभारणार

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : शहरातील आठवडी बाजारातील कर वसुलीसाठी खासगी ठेका देणे व ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याच्या जागेवरून सत्ताधारी - विरोधकांच्यात मासिक सभेत जोरदार खल झाला. कर वसुलीचा ठेका देण्यास विरोधी नगरसेवकांनी विरोध केल्याने हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. शहरात नवीन अंगणवाड्यांची मागणी करणे व जुन्या दुरुस्त करणे, गॅस शवदाहिनीची दुरुस्ती करणे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारणीस परवानगी देणे आदी ठराव मंजूर करण्यात आले.

पीठासीन अधिकारी आनंदराव मलगुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. आठवडी बाजारातील कर वसुलीसाठी खासगी ठेका देण्याच्या विषयाला विरोधी नगरसेवक अमित ओसवाल, राजवर्धन पाटील, अजित पाटील यांनी विरोध केला. खासगी ठेकेदार मनमानीपणाने वसुली करेल त्यामुळे सामान्य व्यापाऱ्यांना त्रास होईल, असे विरोधकांचे म्हणणे होते. मात्र पालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांनी हा ठराव बहुमताने मंजूर केला. ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी शहरात उरुण परिसरात व प्रभाग क्रमांक एकमध्ये विरंगुळा केंद्र उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. विरोधकांनी याच ठिकाणी केंद्र उभारण्यापेक्षा लोकांची मागणी आहे तिथे केंद्र उभा करा, अशी मागणी केली. यावरून बराच वेळ सभेत खल सुरू होता.

आष्टा नाका ते जुना कामेर रोड या मार्गाला दिवंगत नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांचे नाव देण्याचा व त्यांच्या नावाची स्वागत कमान उभारण्यास परवानगी देण्याचाही ठराव मंजूर करण्यात आला. या विषयावर विरोधी नगरसेवक सतेज पाटील यांनी यापूर्वी मी कोल्हापूर नाका येथे धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा व क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथील पेट्रोल पंपासमोर वीर शिवा काशीद यांचा पुतळा उभारण्याची मागणी केली होती, तो विषय विषय पत्रिकेवर का घेतला नाही? असा सवाल उपस्थित केला. यावर मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी पुतळा उभारण्याचा अधिकार नगरपालिकेला नाही. त्यामुळे आधी पुतळा समिती स्थापन करावी लागेल, असे स्पष्टीकरण दिले.

पालिकेच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांचे तैलचित्र लावावे, अशी मागणी नगरसेवक राजवर्धन पाटील व स्वरूप मोरे यांनी केली. प्रा अरुणादेवी पाटील व डॉ. संग्राम पाटील यांनी खेड रस्त्यावरील स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी उभा करण्याची मागणी केली. सुभाष सूर्यवंशी, संग्रामसिंह पाटील, शुभांगी शेळके, अनिता ओसवाल, लता कुर्लेकर यांनी चर्चेत भाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT