इस्लामपुरातील मुख्य चौक बनले पार्किंगचे अड्डे 
सांगली

इस्लामपुरातील मुख्य चौक बनले पार्किंगचे अड्डे

चौकांचे वाहनतळांमध्ये रूपांतर; वाहतूक कोंडी नित्याचीच

पुढारी वृत्तसेवा
सुनील माने

इस्लामपूर : शहरातील गांधी चौक आणि इतर मुख्य चौकांमध्ये चारचाकी वाहनांचे अनधिकृत पार्किंग वाढल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाल्याची समस्या निर्माण झाली आहे. एकेकाळी शहराची शान असलेले हे चौक आता वाहनतळांमध्ये रूपांतरित झाले आहेत. त्यामुळे पादचार्‍यांना आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गांधी चौक पार्किंगसाठी हक्काचे ठिकाण

शहरातील गांधी चौक हे शहरातील मध्यवर्ती ठिकाण असून, येथे नेहमीच वर्दळ असते. मात्र, सध्या या चौकात चारचाकी वाहने बिनदिक्कतपणे उभी केली जात आहेत. दुकानांसमोर, रस्त्याच्या कडेला आणि अगदी चौकाच्या मध्यभागीही वाहने पार्क केल्याने वाहतुकीसाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते आणि लहान-मोठे अपघातही घडत आहेत. स्थानिक व्यापार्‍यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या दुकानांसमोर वाहने उभी असल्याने ग्राहकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. ज्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. गांधी चौकाप्रमाणेच शहरातील अन्य मुख्य चौक, जसे की बसस्थानक चौक, शिवाजी चौक आणि कचेरी चौक यांचीही अवस्था फारशी वेगळी नाही. या चौकांमध्येही चारचाकी वाहनांचे अनधिकृत पार्किंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक वाहनधारक आपले वाहन रस्त्यावरच सोडून जातात आणि तासन् तास परत येत नाहीत, ज्यामुळे वाहतुकीची समस्या अधिकच गंभीर होते. रिक्षा आणि बस स्टॉपजवळही हीच स्थिती असल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे.

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष?

या समस्येसाठी वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. बेशिस्त पार्किंग करणार्‍यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने वाहनधारकांना मोकळीक मिळाल्याचे चित्र आहे. वाहतूक नियम धाब्यावर बसवून अनेक वाहनधारक पाहिजे तिथे गाड्या पार्क करतात आणि त्यामुळे इतरांना नाहक त्रास सहन करावा लागतो. पोलिसांनी यावर कठोर भूमिका घेऊन बेशिस्त वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. चौकात पोलिस कर्मचारी उपस्थित असूनही, बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.

या गंभीर वाहतूक समस्येवर त्वरित तोडगा काढण्याची गरज आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे. शहरात अधिकृत पार्किंगची सोय उपलब्ध करणे, बेशिस्त पार्किंग करणार्‍यांवर कठोर कारवाई करणे आणि वाहतूक पोलिसांची गस्त वाढवणे हे आवश्यक आहे. केवळ नियम बनवून उपयोग नाही, तर त्यांची अंमलबजावणी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारल्यास नागरिकांची गैरसोय दूर होईल.

पोलिस अधिकार्‍यांशी चर्चा करून तोडगा : मुख्याधिकारी

मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील म्हणाले, चौका-चौकांत पार्किंगसाठी पांढरे पट्टे ओढले आहेत. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांची कारवाई आवश्यक आहे. अनेकदा चारचाकी वाहने रस्त्यात चुकीच्या पद्धतीने उभी केली जातात किंवा वाहतुकीचे नियम मोडतात, ज्यामुळे इतरांना त्रास होतो. नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे वाहतुकीला शिस्त लागेल आणि सर्वांना याचा फायदा होईल. यासंदर्भात पोलिस निरीक्षक यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढू.

राजकीय वरदहस्तामुळे कारवाई होत नाही : ओस्तवाल

सराफ व्यापारी कपिल ओसवाल म्हणाले, शहरातील यल्लमा चौक ते संभाजी चौक या रस्त्याचे रुंदीकरण झालेले नाही. तसेच एक नंबर शाळेजवळ पालिकेच्यावतीने पार्किंग उभे करणार होते, त्याचे काय झाले? वाढती लोकसंख्या आणि शहराचा वाढता विस्तार बघता, ठिकठिकाणी पार्किंग सुविधा केली पाहिजे. वाहतूक पोलिस त्यांचे काम करतात, मात्र राजकीय वरदहस्तामुळे त्यांना काम करण्यास अडचणी ठरत आहेत. पालिकेच्यावतीने यल्लमा चौक परिसरात मोठे शॉपिंग सेंटर उभे राहत आहे. येथे पार्किंगची सुविधा करावी. तसेच गांधी चौकात छोटी पोलिस चौकी उभी करून 24 तास वाहतूक पोलिस थांबले, तर वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT