ईश्वरपूर : ईश्वरपूर शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असून बाजारपेठेची व्याप्ती आणि लोकसंख्याही वाढत आहे. शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालयांची पुरेशी व्यवस्था नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. दुसरीकडे, वाहतुकीचाही बोजवारा उडत आहे. या प्रश्नांकडे नगरपालिकेने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
ईश्वरपूरमधून बहे, ताकारी, पेठ, कामेरी, पेठ आणि उरूण या मार्गांवर दररोज सकाळी नागरिक फिरायला जातात. मात्र, या मार्गांवर नगरपालिका हद्दीपर्यंत सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो.
विशेषतः महिलांची गैरसोय होते. शहरात बाजारहाट आणि खरेदीसाठी ग्रामीण भागातून नागरिक येतात. मात्र, बाजारपेठेत सार्वजनिक स्वच्छतागृहांची पुरेशी व्यवस्था नाही. पूर्वी तहसील कार्यालयासमोर चार ते पाच स्वच्छतागृहे होती. सध्या ती उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची ये-जा सुरू असल्याने पादचाऱ्यांना बाजारातून मार्ग काढणेही कठीण होते. तहसील कार्यालय आणि न्यायालय परिसरातही दुचाकी व चारचाकी वाहनांचे पार्किंग होत आहे.
ईश्वरपूर शहरात खरेदीसाठी तसेच विविध कामांसाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने महिला येतात. मात्र, शहरात महिलांसाठी स्वतंत्र आणि स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेकदा महिलांची मोठी कुचंबणा होते. नगरपालिकेने शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ आणि वर्दळीच्या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे तातडीने उभारण्याची गरज आहे. यासाठी पालिकेकडे मागणी करणार आहे.-अनिता ओसवाल, नगरसेविका, ईश्वरपूर