इस्लामपूर : गणेशोत्सव अवघ्या 25 दिवसांवर आल्याने इस्लामपूर शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये आतापासूनच गणेशमूर्तींचे आणि सजावटीच्या साहित्याचे स्टॉल सजले आहेत. बाप्पाच्या स्वागताची शहरात लगबग सुरू झाली आहे.
गणेशोत्सवासाठी अनेक घरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मूर्ती बुकिंग करण्यासाठी नागरिक येत आहेत. मूर्तिकारांनी यंदा विविध आकर्षक रूपांतील गणेशमूर्ती बाजारात विक्रीसाठी आणल्या आहेत. इको-फ्रेंडली (शाडू मातीच्या) मूर्तींना यंदा विशेष मागणी असल्याचे विक्रेते सांगत आहेत. यावेळी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे लोकांचा कल वाढल्याचे दिसत आहे. गणेशमूर्तीवर अंतिम हात फिरवण्यासाठी कारागीर, मूर्तिकार यांची लगबग सुरू झाली आहे. शासनाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती बनवण्याची बंदी उठवत 6 फुटाच्या आतील गणेशमूर्ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित न करण्याची अट घालून दिली आहे. त्यामुळे शाडूच्या गणेशमूर्तींना मागणी वाढली आहे. पर्यावरणविषयक जाणीव सर्व स्तरावर निर्माण व्हावी आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा यासाठी इको फ्रेण्डली व शाडू मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना भाविकांनी करावी, यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते यांच्याकडून प्रबोधन सुरू आहे.
सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात गणेशमूर्ती बनवणारा कुंभार समाज जास्त आहे. यावर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे प्रमाण घटले आहे. परंतु शाडू मूर्तींचे प्रमाण कमी असल्याने शाडू मूर्तीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, असे जिल्हा कुंभार समाज अध्यक्ष नंदकुमार कुंभार यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी लागणारे थर्माकोल, मखर, रंगीबेरंगी कागद, फुलांच्या माळा, विद्युत रोषणाई आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. स्टॉलवर खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. लहान मुलांमध्येही गणपतीच्या सजावटीसाठी विशेष उत्साह दिसत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचीही तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. अनेक ठिकाणी मंडप उभारणीचे काम सुरू झाले आहे. यावर्षी देखील पारंपरिक पद्धतीसोबतच सामाजिक संदेश देणार्या देखाव्यांवर अधिक भर दिला जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी इस्लामपूरकर सज्ज झाले आहेत.
सध्या शाडू मातीच्या गणेशमूर्ती करण्यावर कुंभार समाजाने भर दिला आहे. शाडूच्या गणेशमूर्ती व गौरी मूर्तींना मागणी वाढू लागली आहे. शाडूची गणेशमूर्ती घरच्या घरी विसर्जन करू शकतो. त्यामुळे शाडू मूर्ती घेण्याकडे भक्तांचा कल वाढू लागला आहे. यावर्षी गणेशमूर्तीच्या किमती वाढल्या आहेत.प्रा. रोहिणी कुंभार, शाडू मूर्ती विक्रेत्या, इस्लामपूर