इस्लामपूर : येथील मार्केट यार्डमधील जयंत ट्रेडिंग कंपनी या फर्निचर दुकानाला गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागून 25 लाख रुपयांचे नुकसान झाले. नगरपालिकेचे अग्निशमन पथक, राजारामबापू कारखान्याच्या अग्निशमन पथकाने आग आटोक्यात आणली. नागरिकांच्या प्रयत्नांमुळे आग वेळेत रोखली गेली.
विकास राजमाने यांचे मार्केट यार्ड परिसरात फर्निचर, कपाटे, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदींचे दुकान आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे त्यांनी दुकान उघडले. ग्राहकांना माल देण्याचे सुरू होते. 10.30 वाजण्याच्या सुमारास तिसर्या मजल्यावर गोदामातून धुराचे लोट येत असल्याचे कर्मचार्यांनी पाहिले. कर्मचार्यांनी तिकडे धाव घेतली असता शॉर्टसर्किटने आग लागल्याचे दिसले. कपाटे, सोफा आदी फर्निचर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
आगीने कपाटाच्या काचा फुटू लागल्याने गोदामात जाता येत नव्हते. तेथे सर्वत्र धूर झाला होता. तेथील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. आगीत गोदामातील साहित्य जळाले. विद्युत वाहिन्या वितळल्या, भिंती, छत काळे पडले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली. तलाठी विठ्ठल कांबळे यांनी पंचनामा केला. विकास राजमाने यांनी मोठ्या जिद्दीने हे दुकान उभारले होते. या घटनेने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
राजमाने यांचे दुकान मुख्य बाजारपेठेत आहे. कर्मचारी दररोज रात्री दुकान बंद करताना दुकानातील वीज पुरवठा बंद करतात. गुरुवारी सकाळी आग लागल्याचे लगेच लक्षात आल्याने आग लवकर आटोक्यात आली. त्यामुळे अनर्थ टळला.