ईश्वरपूर : जनगणनेच्या पुढील टप्प्यातील घरगणनेसाठी नियुक्तप्रगणकांना साहित्य वाटप करताना प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका बसल्याचे चित्र ईश्वरपुरात पाहायला मिळाले. सकाळी 11 वाजता बोलावलेल्या शेकडो प्रगणकांना साहित्य मिळण्यासाठी सायंकाळपर्यंत ताटकळत राहावे लागले.
घरगणना प्रक्रियेसाठी यापूर्वीच प्रगणकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, काल ईश्वरपूर तहसील कार्यालय येथील प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील रोजगार हमी योजना कार्यालयात साहित्य वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 565 प्रगणकांसह पर्यवेक्षकांनाही एकाच वेळी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आल्याने कार्यालय परिसरात प्रचंड गर्दी झाली. साहित्य वाटपासाठी केवळ चार ते पाच अधिकारी-कर्मचारी कार्यरत असल्याने संपूर्ण प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू होती. प्रगणकांकडून दोन फोटो, पॅनकार्डची झेरॉक्स आदी कागदपत्रे घेऊन त्यानंतर ओळखपत्र तयार करण्यात येत असल्यामुळे प्रत्येकाला दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत होती. अनेक प्रगणकांनी सकाळी फॉर्म जमा करूनही संध्याकाळी सहा वाजेपर्यंत साहित्य मिळाले नसल्याची तक्रार केली, तर काहींना रात्री उशिरापर्यंतही प्रतीक्षा करावी लागली.
उन्हाच्या तीव्रतेत व्हरांंड्यात कोणतीही बैठक व्यवस्था नसल्याने प्रगणकांची गैरसोय झाली. काही ठिकाणी वादावादीचे प्रसंगही निर्माण झाले. दरम्यान, सर्व प्रगणकांना एकाचवेळी बोलावण्याऐवजी टप्प्या-टप्प्याने वेळ देऊन बोलावले असते किंवा पर्यवेक्षकांकडेच संबंधित प्रगणकांचे साहित्य सुपूर्द केले असते, तर हा गोंधळ टाळता आला असता, अशी चर्चा सुरू होती.