ईश्वरपूर : शेणे (ता. वाळवा) येथील स्मशानभूमीत करणी आणि जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाळवा तालुक्यात अशा स्वरूपाचे अनेक प्रकार सातत्याने समोर येत आहेत.
स्मशानभूमीत आढळलेल्या या करणीच्या साहित्यात नारळ, लिंबू, काळी बाहुली, सुया, कोहळे आणि काळ्या कापडाचा समावेश होता. हा प्रकार लक्षात येताच गावातील सामाजिक कार्यकर्ते संतोष शेटके यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांच्याशी संपर्क साधला. अंनिसची टीम गावात पोहोचण्यापूर्वीच ग्रामपंचायतीने हे साहित्य तिथून हटवले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गावात लवकरच प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याची माहिती संजय बनसोडे यांनी दिली.
बनसोडे म्हणाले की, नागरिकांनी अशा करणी आणि जादूटोण्यासारख्या प्रकारांबाबत सजग राहणे आवश्यक आहे. अशा कृत्यांतून कोणाचेही चांगले किंवा वाईट करता येत नाही. असे प्रकार करणाऱ्या व्यक्तींवर, तसेच बुवाबाजी करणाऱ्या मांत्रिकांवर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले जाऊ शकतात. कुठेही असे संशयास्पद प्रकार घडत असल्यास त्याची माहिती तत्काळ अंनिसला द्यावी. आम्ही अशा प्रकरणांची दखल घेऊन योग्य कारवाईसाठी पाठपुरावा करू. आपल्या कुटुंबाला आणि समाजाला बुवाबाजीपासून दूर ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.