ईश्वरपूर : जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी अपात्र ठरविलेले राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे व त्यांचे बंधू नगरसेवक सुनील मलगुंडे यांना नगरविकास मंत्रालयाने मोठा दिलासा दिला. पुढील आदेश येईपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाला स्थगिती देण्यात येत असल्याचे आदेश नगरविकास मंत्रालयाने गुरुवारी काढले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अपात्रतेच्या निर्णयाविरोधात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दोघांनी अपील दाखल केले होते. नगरविकास मंत्रालयाच्या या आदेशाने महायुतीला धक्का बसला आहे. पेठ-सांगली रोडला मलगुंडे बंधूंनी विनापरवाना व अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यामुळे त्यांचे नगराध्यक्ष व नगरसेवक पद रद्द करावे, अशी तक्रार शिवसेनेचे जयकर जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या प्रकरणात नगराध्यक्ष मलगुंडे आणि बंधू नगरसेवक सुनील मलगुंडे यांना दोषी ठरवून जिल्हाधिकारी घोष यांनी १० जुलै व १३ जुलै रोजी अपात्र ठरवले होते.
या अपात्रतेविरोधात मलगुंडे बंधूंनी १६ जुलैरोजी नगरविकास खात्याकडे अपील दाखल केले होते. या अपिलात मलगुंडे बंधूंनी हे बांधकाम अनधिकृत नाही, रीतसर परवानगी व नियमानुसार केले आहे, ज्या नियमानुसार अपात्रता कारवाई झाली, तो नियम अपात्रतेला लागू होत नाही, पदावर असताना अनधिकृत बांधकाम केल्यानंतर तो नियम लागतो. इमारत मंजूर झाली तेव्हा आम्ही कोणीही पदाधिकारी नव्हतो. ज्यावेळी ही इमारत उभारली गेली, त्यावेळी ती नियमांना अधीन राहून झाली आहे. नंतर महामार्गामुळे मार्जीन कमी दिसत आहे. त्यामुळे हे बांधकाम अनधिकृत होऊ शकत नाही, असे म्हटले होते.
या अपिलावर गुरुवारी सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली. मात्र, पुढील आदेश येईपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या अपात्रतेच्या आदेशाला उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार स्थगिती देण्यात येत आहे, असा आदेश नगरविकास मंत्रालयाचे अप्पर सचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. मंत्र्यांच्या या आदेशामुळे शिवसेनेच्या नगरसेवकास ईश्वरपुरात महायुतीला धक्का बसला आहे. या आदेशानंतर नगराध्यक्ष मुलगुंडे आज पुन्हा पदभार स्वीकारणार आहेत.