सांगली

Ishwarpur leopard rescue: गर्दी, गोंगाटामुळे अडथळे; अखेर सौम्य लाठीमार

बिबट्याला मोबाईलमध्ये टिपण्यासाठी धावाधाव

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : आपल्याकडे जंगल साक्षरतेबाबत आनंदी-आनंदच असल्यामुळे वन्यप्राण्यांचे हाल झाल्याची तसेच ते मृत्युमुखी पडल्याची अनेक उदाहरणे आहेत. येथे सोमवारी नागरी वस्तीत बिबट्या घुसल्यानंतर लोकांचे बेजबाबदार वर्तन पुन्हा दिसले.

बिबट्य पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. अनेकजण मोबाईलमध्ये चित्रीकरणासाठी प्रयत्न करीत होते. गर्दी वाढत होती, त्यामुळे पोलिसांना बंदोबस्त वाढवावा लागला. तरीही गर्दी आटोक्यात येत नव्हती. त्यामुळे पोलिसांच्या नाकीनऊ आले. अखेर सौम्य लाठीमार करावा लागला.

नगरसेवक राजवर्धन पाटील यांनी बिबट्याला बेशुद्ध करून पकडावे, अशी मागणी वन विभागाकडे केली होती. यासाठी आ. सत्यजित देशमुख व भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्याशी संपर्क साधून वन विभागाला तशी सूचना करावी, अशी मागणी त्यांनी केली. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन वंजारी, डॉ. प्रसाद पाटील डॉ. मुकुंद वाटेगावकर, डॉ. संतोष वाळवेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बिबट्याला बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन दिले. वन विभागाच्या शार्प शूटरनी अचूक नेम धरत बिबट्याला इंजेक्शन दिले. बेशुद्ध झाल्यानंतर त्याला पिंजर्‍यात घालून वन विभागाच्या कार्यालयात नेले. तासाभरानंतर तो शुद्धीवर आला. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

वन संरक्षक सागर गवते, उपवनसंरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्र रमेश कांबळे, कुंभार, वनपाल डी. व्ही. बर्गे, वनरक्षक भिवा कोळेकर आदींनी हे ऑपरेशन राबविले. त्यांना नगरसेवक राजवर्धन पाटील, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नगरसेवक सतेज पाटील आदींनी मदत केली. यावेळी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली. माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी झुडपात जाऊन बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. बिबट्याचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेराही वापरण्यात आला. माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांनी ड्रोन उपलब्ध करून दिला. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी बंदोबस्त तैनात केला होता.

शेतातून थेट घरात...

काही दिवसापासून उरुण परिसरात बिबट्याचे सातत्याने दर्शन होत होते. अनेक जनावरांवर त्याने हल्ला केला होता. आता तो घरात शिरला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT