सुनील माने
ईश्वरपूर : ईश्वरपूर शहर सतत वाढत असताना वाहतुकीची समस्या अधिकाधिक गंभीर बनत चालली आहे. शहरातील वाढती लोकसंख्या, रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या राहिलेल्या निवासी व व्यावसायिक इमारती, तसेच पार्किंगची अपुरी सोय या सर्व कारणांमुळे शहरातील रस्ते वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. सध्या शहराची लोकसंख्या लाखाच्या घरात पोहोचली असून घरोघरी दुप्पट-तिप्पट वाहने दिसू लागली आहेत. परिणामी, शहरातील मुख्य चौकांमध्ये दररोज वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
पालिकेकडे वारंवार तक्रारी जात असूनही अद्याप शहरात स्वतंत्र वाहन तळ उभारण्याचे ठोस पाऊल उचललेले नाही. अनेक व्यावसायिक इमारती उभ्या राहताना पार्किंगसाठी नियोजित जागा सोडली जात नाही. त्यामुळे इमारतीसमोरच चारचाकी आणि दुचाकी उभ्या केल्या जातात व त्यामुळे रस्ते अरुंद होतात. बाजारपेठांमध्ये तर परिस्थिती अधिक बिकट आहे. खरेदीसाठी आलेले अनेक नागरिक रस्त्याच्या कडेला वाहने उभी करून बाजारात जातात. परिणामी मुख्य मार्गांवर वाहतुकीचा चक्काजाम होतो. वाहतुकीतील या गोंधळामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. सकाळी शाळा सुरू होण्याच्या आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहने रांगा लावतात. शहरातील प्रमुख ठिकाणी नगरपालिका मल्टिलेव्हल किंवा खुल्या जागेतील वाहनतळाची व्यवस्था होणे गरजेचे आहे.
शहराच्या सीमेजवळ मोठ्या मोकळ्या जमिनी असताना त्यांचा योग्य वापर करून नियोजनबद्ध वाहन तळ उभारल्यास ही समस्या मोठ्या प्रमाणावर सोडवता येऊ शकते. तसेच, नागरिकांमध्ये नियमावलीबाबत जागरुकता निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पोलिस विभागानेही चुकीचे पार्किंग करणाऱ्यांवर नियमित कारवाई सुरू ठेवावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा व्यक्त होत आहे. वाहतुकीच्यादृष्टीने मकरसंक्रांत, गणेशोत्सव, दिवाळी, दसरा, ईद यांसारख्या सणांदरम्यान शहरात प्रचंड गर्दी होते. त्या काळात रस्त्यांवर उभ्या राहिलेल्या वाहनांमुळे अग्निशमन व रुग्णवाहिका सेवेलादेखील अडथळा निर्माण होतो. शहरात उभ्या राहत असलेल्या अनेक उंच इमारतींमध्ये नियमाप्रमाणे पार्किंगची तरतूद करण्यात येत नाही. त्यामुळे रहिवाशांना वाहन उभे करण्यासाठी रस्त्यांचाच आधार घ्यावा लागतो. विशेषतः व्यापारी भागात अनेक ग्राहक खरेदीसाठी येताना वाहने रस्त्यावरच उभी करतात. यामुळे महत्त्वाच्या चौकांमध्ये चक्का जाम होऊन वाहतूक यंत्रणेचा बोजवारा उडत आहे. शहरातील शिवाजी चौक, जुना बस स्टँड परिसर, मुख्य बाजारपेठ, कोर्ट रोड या भागामध्ये पार्किंगसाठी स्वतंत्र जागा नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. शहरात किमान दोन ते तीन ठिकाणी बहुमजली वाहनतळ उभारण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.