सांगली : सांगली जिल्ह्यात दीड वर्षापूर्वी प्रथमच महिलांच्या हाती एसटीचे स्टेरिंग देण्यात आले. नऊ महिलांची चालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. एसटी चालवणं बायकांचं काम आहे का?, असे हजार सवाल आणि शंकांना या महिला चालकांनी चोख उत्तर दिले. विना अपघात सेवा देत प्रवाशी, प्रशासनाबरोबर शासनाचा विश्वास सार्थ ठरवला.
एसटी महामंडळाची राज्यातली पहिली बस १ जून १९४८ रोजी अहमदनगर ते पुणे धावली होती. या ऐतिहासिक घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने शासनाने प्रथमच महिला कर्मचाऱ्यांना चालक पदावर नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. पुरुषांची मक्तेदारी असणार्या या खुर्चीवर आता महिला बसणार होत्या. वाहक म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर महिलांच्या हाती एसटीचे स्टेअरिंग देण्याचे मोठे काम शासनाने केले आणि ७५ वर्षांनी महिलांना ही संधी मिळाली. २०१९ मध्ये झालेल्या सरळ सेवा भरतीतून सांगली विभागासाठी नऊ महिलांची नियुक्ती झाली आणि वैद्यकीय तपासनीनंतर ३८० दिवसासाठी त्यांना प्रत्यक्ष बस चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. हा क्षण त्यांच्यासाठी आनंदापेक्षाही अभिमानाचा जास्त होता.
अखेर १७ ऑगस्ट २०२३ रोजी या नऊही महिलांच्या हातात प्रवाशी बसचे स्टेरिंग देण्यात आले. सद्या मिरज आगारात ६ तर सांगली आगारात ३ महिला चालक सेवा देत आहेत. गेल्या दीड वर्षात यातील एकाही महिला चालकांकडून किरकोळ अपघातही झालेला नाही. आता तर त्या लांब पल्ल्याच्या गाड्यामध्येही सेवा देत आहेत.
सीमा सचिन लोहार, शारदा महानंद मदने, सुवर्णा भगवान अंबवडे (सर्व सांगली), कविता मुकुंद पवार, नसिमा खलील तडवी, अंजुम मैनुद्दीन पिरजादे, मिनाताई भिमराव व्हनमाने, ज्योती सुकलाल ठोसरे, स्मिला प्रल्हाद मधाळे (सर्व मिरज)
आगार व्यवस्थापिका : ८
वाहतूक निरीक्षक : ४
चालक : ९
वाहक : १९८
लिपीक : ७२
इतरसह एकूण : ३८५
मला वाहन चालवण्याची आवड होती. शिक्षण झाल्यानंतर गृहिणी म्हणून जबाबदारी सांभाळताना एसटीत चालक पदासाठी परिक्षेत उत्तीर्ण झाले. खडतर प्रशिक्षणही झाले. आता मी बस चालक म्हणून अभिमानानं सेवेचा आनंद घेत आहे. प्रवाशांच्या जीवाची जबाबदारी आमच्यावर असते. याचे भान आम्ही नेहमी ठेवत असतो.सीमा लोहार ( बस चालक, सांगली )