सांगली : सांगलीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभे करावे, अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडवीय आणि क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांची आमदार गाडगीळ यांनी दिल्ली येथे भेट घेतली व त्यांना क्रीडा संकुलाबाबतचे निवेदन दिले. यावेळी त्यांनी याबाबत तातडीने विचार करण्याचे आश्वासन दिले.
आमदार गाडगीळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगली जिल्ह्याने क्रीडा क्षेत्रात मोठा लौकिक मिळवलेला आहे. क्रिकेट, कुस्ती, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बुद्धिबळ अशा अनेक खेळात सांगलीच्या खेळाडूंनी लौकिक मिळवलेला आहे. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक स्पर्धांत सांगली जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी लक्षणीय देदीप्यमान यश मिळवले आहे. क्रीडा क्षेत्रातील वाढता उत्साह, स्थानिक खेळाडूंची संख्यात्मक वाढ, अद्ययावत प्रशिक्षण व सुविधांची आवश्यकता लक्षात घेतली, तर येथे अद्ययावत क्रीडा संकुल उभारणे गरजेचे आहे.
सांगलीसारख्या क्रीडाप्रेमी मध्यवर्ती भागात आधुनिक क्रीडा संकुल उभारल्यास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी ठरणार्या खेळाडूंचा विकास शक्य होईल. त्यामुळे केंद्र सरकारने सांगलीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचा विकास करून तिथे सर्व सुविधांनीयुक्तअत्याधुनिक क्रीडा संकुल उभे करावे. त्यामुळे युवकांना दर्जेदार प्रशिक्षण, सुविधा व संधी उपलब्ध होतील. केंद्रीय मंत्री मांडवीय आणि राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी या निवेदनाची सकारात्मक दखल घेतली आहे.