Sangli News 
सांगली

Sangli News : एकाचवेळी पोलिस, सहकार विभागाकडून चौकशी सुरू

विनायक शिंदे यांच्यासह संबंधितांची होणार चौकशी

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत तत्कालीन अध्यक्ष व उपाध्यक्षांनी कर्मचारी भरतीचा बोगस ठराव केल्याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. तसेच याप्रकरणी तत्कालीन अध्यक्ष विनायक शिंदे व उपाध्यक्ष यांच्यविरुध्द यापूर्वीच तक्रार देण्यात आली आहे.

सहकार आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून त्याचा चौकशी अहवाल सादर करावा. या आदेशामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष जगन्नाथ कोळपे यांनी चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार हे आदेश देण्यात आले आहेत.

याबाबत जगन्नाथ कोळपे म्हणाले, बँकेचे तत्कालीन उपाध्यक्ष फत्तू नदाफ व माजी अध्यक्ष विनायक शिंदे यांनी कर्मचारी भरती करण्यासंदर्भात कर्मचारी उपसमिती किंवा संचालक मंडळामध्ये कोणतीही अधिकृत बैठक बोलावून ठराव केला नाही. बोगस ठराव करून सातारा जिल्हा बँक असोसिएशनबरोबर कर्मचारी भरतीचा करार केला. तशी जाहिरातदेखील दिली गेली. या दोघांनी अधिकार नसताना संस्थेच्या हिताविरोधात काम केले. अध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक झाली नसतानादेखील बोगस ठराव केला. त्यामुळे त्यांना संचालक पदावरून दूर करून दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सहकारी संस्था पुणेच्या उपनिबंधकांकडे करण्यात आली होती. यासंदर्भात 19 रोजी सुनावणी झाली. बँकेच्या व्यवस्थापकांनीदेखील अधिकृत ठराव केला नसल्याचे सांगितले होते. शिवाय अशी सभा व इतिवृत्तात काहीही नोंद नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे सहकारी संस्था पुणेचे उपनिबंधक राजेंद्र खंडाईत यांनी जिल्हा उपनिबंधकांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दोन दिवसात आता चौकशीला सुरुवात होणार असल्याचे जगन्नाथ कोळपे यांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात दोन संचालकांवर फौजदारी दाखल करावी, अशी तक्रार पोलिस ठाण्यातदेखील दिली आहे. यावरदेखील कार्यवाही होईल, असे मत कोळपे यांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT