सांगली; पुढारी वृत्तसेवा : उघड्या अंगावर फिरू नकोस, असे सांगितल्याच्या कारणावरून सुधाकर बबन भोसले (वय 40, रा. गोल्ड प्लाझा, गणपती पेठ, सांगली) यांच्या डोक्यात कुकर घातला. त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केली. याप्रकरणी चौघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शाहरूख अजगरअली, मोहम्मद ऊर्फ राजू युसूस अली, शोरीफुल मोजीद इस्लाम व अजीज अली (सर्व रा. गोल्ड प्लाझा, गणपती पेठ, सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जखमी भोसले यांचे मूळ गाव नेलकरंजी (ता. आटपाडी) आहे. सध्या ते कुटुंबासह गणपती पेठेत राहतात. संशयित अजगरअली यांच्या दुकानातील कामगाराने उघड्या अंगावर भोसले यांच्या घरात खिडकीतून डोकाऊन पाहिले.
भोसले यांनी त्याला उघड्या अंगावर बिल्डींगच्या परिसरात फिरू नकोस, असे सांगितले. यातून त्यांच्यात वाद झाला. कामगाराने अजगरअलीला हा प्रकार सांगितला. त्यानंतर अजगरअलीसह चौघांनी भोसले यांना जाब विचारला. घरातील कुकर घेऊन त्यांच्या डोक्यात घातला. त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केली. रात्री उशिरा भोसले यांनी फिर्याद दाखल केली.