मिरज : शहरात गणेश आगमन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट पाहायला मिळाला. Pudhari Photo
सांगली

मिरजेत पोलिसांचे आवाहन झुगारून डीजेचा दणदणाट

पुढारी वृत्तसेवा

मिरज : पुढारी वृत्तसेवा

मिरजेत गणेशोत्सवात डीजे मुक्तीसाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असतानाच काही मोठ्या गणेश मंडळांनी गणेश आगमन मिरवणूका काढून डीजेचा दणदणाट केला. आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणार्‍या मंडळांवर कारवाईचा इशारा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी मिरजेत शांतता समितीच्या बैठकीत दिला. तसेच गणेशोत्सव व ईदच्या अनुषंगाने पोलिसांनी शहरात संचलन केले. मिरजेत गणेशोत्सवापूर्वीच काही मंडळांनी डीजेच्या दणदणाटात गणेश आगमन मिरवणुका काढल्या. आगामी गणेश उत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर मिरजेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या अध्यक्षतेखाली मिरज शहरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी, शांतता समिती सदस्य, मोहल्ला कमिटी सदस्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

डीजे लावून आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणार्‍या मंडळांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी बैठकीत दिला. उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी सांगितले, आगामी गणेशोत्सव डीजे मुक्त साजरा करावा. गणेश उत्सव मंडळांनी लेझर लाईटचा वापर टाळावा. मिरजेत डीजेवर नियंत्रण ठेवले जाईल. सर्वोच्च न्यायालयांच्या ध्वनी प्रदूषणाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात येईल. सर्व गणेश मंडळांनी वर्गणीचा वापर विधायक कामासाठी करावा. एक कॅमेरा पोलिसांसाठी यानुसार प्रत्येक मंडळाने एक सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले.

आगामी गणेशोत्सव व ईद सणाच्या अनुषंगाने स्टेशन चौकात पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत दंगा काबू प्रात्यक्षिक केले. मिरासाहेब दर्गा, भंडारीबाबा दर्गा, पोलिस स्टेशन चौक, किसान चौक, महाराणा प्रताप चौक, सराफ कट्टा मार्गे गणेश तलावापर्यंत पथसंंचलन पार पडले. अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोखर, उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, तहसीलदार अर्चना मोरे, मनपा अतिरीक्त आयुक्त रवीकांत अडसुळ, उपायुक्त संजीव ओहोळ यांच्यासह विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव, मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक भैरू तळेकर, सहाय्यक निरीक्षक सुनील गिड्डे, दीपक भांडवलकर, जयदीप कळेकर यांच्यासह 14 अधिकारी, 60 पोलिस कर्मचारी व पोलिस मुख्यालयाचे 22 कर्मचारी व राखीव तुकडी संचलनात सहभागी होती.

युवानेत्याचा जयजयकार

मिरजेत उदगाव वेस परिसरात एका मंडळाचा कार्यक्रम युवा नेत्याच्या उपस्थितीत जोरदार डीजे लावून सुरू होता. पोलिसांनी डीजे यंत्रणा ताब्यात घेतली. मात्र काही वेळातच डीजे परत देण्यात आल्याने युवा नेत्याचा जयजयकार करण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT