सांगली

सांगली : केवळ 57 गावांत ‘एक गणपती’!

दिनेश चोरगे

सांगली :  जिल्ह्यात 'एक गाव एक गणपती' संकल्पनेस यंदा अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला आहे. महात्मा गांधी तंटामुक्त अभियानावेळी तीनशेहून अधिक गावांनी या संकल्पनेचा स्वीकार केला होता. यंदा मात्र जिल्ह्यात 720 पैकी केवळ 57 गावांतील ग्रामस्थांनी 'एक गाव एक गणपती' बसविला आहे.

महात्मा गांधी तंटामुक्त अभिनायाचा पुरस्कार पटकाविल्यानंतर अनेक गावे या प्रवाहातून बाहेर गेल्याने गावांची संख्या घटली असल्याचे दिसून येते. गावातील तंटे कमी व्हावेत, सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमधील जीवघेणी स्पर्धा संपावी, गावात एकोबा नांदावा, मिरवणुकीवरून मारामारी होऊ नये, कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, वर्गणीसाठी कोणाला सक्ती होऊ नये, पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण कमी व्हावा, यासाठी 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. नितीन करीर यांनी 26 वर्षापूर्वी 'एक गाव एक गणपती' संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला. पोलिसांच्या मदतीने याचे प्रत्येक गावात जाऊन महत्व सांगण्यात आले. सुरुवातीला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पण महात्मा गांधी तंटामुक्त अभियान सुरू झाल्यापासून या विधायक उपक्रमात सहभागी होणार्‍या गावांची संख्या वाढत गेली.

तंटामुक्त अभियानात जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांकही पटकाविला आहे. त्यावेळी 334 गावांतील ग्रामंस्थांनी एकत्रित येऊन 'एक गणपती' बसवून राज्यात आदर्श निर्माण केला होता. त्याच्या दुसर्‍यावर्षी 302 गावांत हा संकल्प राबवला गेला. मात्र अभियानातून पुरस्कार मिळाल्यानंतर अनेक गावांना या संकल्पनेचा विसर पडला असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात 25 पोलिस ठाणी आहेत. पोलिस ठाण्यांपासून अनेक गावे 10 ते 40 किलोमीटर अंतरावर आहेत. कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणारी एखादी गंभीर घटना घडली तर पोलिसांना पोहोचण्यासाठी किमान अर्धा तास तरी लागतो.

गणेशोत्सवात तर कुठे-ना-कुठे अनुचित प्रकार घडतोच. यासाठी प्रत्येक वर्षी पोलिस प्रत्येक गावात जाऊन 'एक गाव एक गणपती' संकल्पनेचा स्वीकार करण्यासाठी प्रबोधन करतात. सरपंच, पोलिस पाटील, ग्रामस्थ व गणेश मंडळांच्या कार्यककर्त्यांची बैठक घेऊन त्यांना आवाहन करतात.

शेवटपर्यंत पोलिसांनी केले प्रयत्न…

प्रत्येक गावांतील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन 'एक गणपती' बसवावा, यासाठी पोलिसांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला, पण केवळ 57 गावांनी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. उत्सव साजरा करण्यासाठी पोलिस ठाण्यात मंडळाचे कार्यकर्ते परवाना घेण्यासाठी आलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचे प्रबोधन करण्यात आले होते. गतवर्षी 81 गावांत 'एक गणपती' बसला होता. यंदा यामध्येही घट झाल्याचे दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT