सांगली : सध्या साखरेला मिळत असलेल्या दरानुसार कोल्हापूर जिल्ह्यात उसाच्या दराचा पॅटर्न निश्चित करण्यात आला आहे. मात्र, सांगली जिल्ह्यातील सर्वपक्षीय कारखानदार शेतकऱ्यांना लुटण्यासाठी एकत्र आले आहेत. हे खपवून घेणार नाही. कोल्हापूरप्रमाणे सांगलीतही उसाच्या दराचा पॅटर्न सात दिवसांच्या आत जाहीर करावा. अन्यथा सर्व शेतकरी संघटनांना एकत्रित करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला.
सांगलीत वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यासमोर रविवारी खर्डा-भाकरी खात आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 'कारखानदार तुपाशी, शेतकरी उपाशी', 'कोण म्हणतंय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही', 'उसाला प्रतिटन ४ हजार ५०० रुपये दर मिळालाच पाहिजे', अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी भाजपाचे नेते पृथ्वीराज पवार, गौतम पवार, गणेश कोडते उपस्थित होते.
आमदार खोत म्हणाले, राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन महिना झाला आहे. मात्र, अद्यापही कारखानदार उसाला किती दर देणार, हे सांगण्यास तयार नाहीत. सांगली जिल्ह्यातील कारखानदारांना वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. (बापू) लाड आणि पतंगराव कदम यांचा वारसा आहे. मात्र, या वारसदारांनी शेतकऱ्यांची दिवाळी काळी केली आहे. त्यामुळेच वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्याची वेळ आली.
सध्या कारखानदारांकडून शेतकऱ्यांना लुटण्याचा उद्योग सुरू आहे. मात्र आम्ही गप्प बसणार नाही. आंदोलनाचा हा तिसरा टप्पा आहे. आता चौथ्या टप्प्यात सात दिवसांच्या आत उसाचा दर जाहीर न झाल्यास सर्व शेतकरी संघटनांना एकत्रित करून रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
आ. जयंत पाटील यांचा कारखान्यांवर दरोडा : आ. खोत
आमदार जयंत पाटील यांनी चार कारखाने बाळगले आहेत. अण्णासाहेब डांगे यांना कारखाना उभा करू दिला नाही. तेथे स्वतःचाच कारखाना उभारला. माजी आमदार पै. संभाजी पवार यांनी संघर्षातून उभारलेल्या कारखान्यावर दरोडा घालून तो ताब्यात घेतला. शेतकऱ्यांनी कर्ज काढून जत येथे उभारलेला कारखानाही दरोडा घालून घेतला, असा आरोप आ. खोत यांनी केला. जिल्हा परिषद मला पाहिजे, कारखाने मला पाहिजेत, पंचायत समिती आणि जिल्हा मध्यवर्ती बँकही मला पाहिजे; पण शेतकऱ्यांना लुटण्याचा अधिकारही मलाच असला पाहिजे, अशी भूमिका आहे का? लुटारूंचे पोट कधी भरणार? शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे कधी देणार? याबाबत बोलायला कोणी तयार नाही, अशी टीका त्यांनी केली.