नांद्रे : मिरज पश्चिम भागात खासगी सावकारीचा अजगर इतका घट्ट आवळला आहे की, सामान्य माणसाचे जगणेच कठीण झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अमानुष आणि बेकायदेशीर धंद्यात आता काही महिलाच थेट आघाडीवर असल्याचे उघड झाले आहे. ‘अडचणीच्या काळात तातडीची मदत’ या गोंडस शब्दाआड गरीब, मजूर, महिला व शेतकरी कुटुंबांची अक्षरशः आर्थिक पिळवणूक सुरू आहे.
ना परवाना, ना कायदेशीर कागदपत्रे, ना व्यवहाराची कोणतीही नोंद, कायद्याच्या चौकटीबाहेर सुरू असलेल्या या सावकारीत गरजूंना पैसे देताना अवाच्या सवा व्याज आकारले जाते. काही प्रकरणांत दरमहा तर काही ठिकाणी आठवड्याला व्याज वसुली होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. वसुलीच्या नावाखाली सतत दमदाटी, मानसिक छळ आणि अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. दागिने, घरगुती वस्तू, शेतीची कागदपत्रे ताब्यात घेऊन दबाव टाकणे, तसेच मुदलापेक्षा दोन ते तीन पट रक्कम उकळल्याचे प्रकारही उघडकीस येत आहेत.
या सावकारीच्या जाळ्यात अडकलेली अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या पूर्णतः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. आजारपण, लग्नकार्य, शेतीचा खर्च किंवा रोजच्या गरजांसाठी घेतलेले कर्ज परतफेडीच्या गर्तेत अडकून नागरिकांचे संतुलन ढासळले आहे. घरा-घरांत तणाव, सततची भांडणे व नैराश्य वाढले असून, काही कर्जदारांनी गाव सोडण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचीही चर्चा परिसरात सुरू आहे.
सामाजिक बदनामी, सूड आणि पुढील त्रासाची भीती यामुळे पीडित तक्रार करण्यास धजावत नाहीत. ‘महिला आहेत म्हणून मोकळीक नको, कायद्याचा कठोर बडगा हवा’ अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.