सांगली

Hutatma sugar factory protest: काहीही करू; राजीनामा घेणारच

आंदोलक आक्रमक; मागणीवर ठाम : वैभव नायकवडी यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

पुढारी वृत्तसेवा

वाळवा : वाळवा येथे हुतात्मा साखर कारखान्यासमोर सुरू असलेल्या आंदोलनात कोणत्याही थराला जावे लागले तरी, अध्यक्ष वैभव नायकवडी यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा ठाम इशारा गौरव नायकवडी यांनी आंदोलकांसमोर दिला. दरम्यान, अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे.

कारखान्याच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी 11 दिवसांपासून सभासद व शेतकरी ठिय्या आंदोलन करत आहेत. किरण नायकवडी, गौरव नायकवडी आणि केदार नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. 15 संचालकही यामध्ये सहभागी झाले आहेत.

गौरव नायकवडी म्हणाले की, कारखान्यात वैभव नायकवडी यांची एकाधिकारशाही सुरू असून संचालक, उपाध्यक्ष आणि अधिकाऱ्यांना कोणतीही किंमत दिली जात नाही. 15 वर्षांपासून गैरकारभार सुरू असून आता विरोधकही त्यांना साथ देत आहेत. तरीही कारखाना सुरू राहावा आणि बंद पडू नये यासाठी आम्ही आतली कामे सुरू ठेवली आहेत. डिस्टिलरी सुरू केली असून अध्यक्षांकडून त्यात अडथळे आणले जात आहेत. उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली कामकाज चालवण्याचा निर्णय घेतला असून आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, मात्र त्यांच्या बदलत्या भूमिकेमुळे आणि वेळकाढूपणामुळे फसवणूक होत आहे.

किरण नायकवडी यांनी सांगितले की, वैभव नायकवडी यांनी सर्वांचा विश्वास गमावला असून संचालकांनी आता ठोस निर्णय घ्यावा. उमेश घोरपडे म्हणाले की, वैभव नायकवडी हे मुंबईत मुख्यमंत्री भेटीसाठी गेले असल्याचे दिसते; मात्र आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्याची त्यांना गरज वाटली नाही. यावेळी संचालक अशोक खोत (पडवळवाडी), कुमार शिंदे (नागठाणे), शाम कदम, संजय नायकवडी, निवृत्ती पाटील (गोटखिंडी), सरपंच संदेश कांबळे यांनीही आपली मते मांडली. कार्यक्रमास वसंत वाजे, सावकार कदम, बाळासाहेब पाटील, महादेव पाटील, पोपट अहिर, ॲड. वरुण माने आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT