Hutatma Sugar Factory Protest File Photo
सांगली

Hutatma factory protest : ‘हुतात्मा’वरील आंदोलनावर आंदोलक ठाम

कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याची मागणी : साखर विक्री बझारकडून कारखान्याकडे

पुढारी वृत्तसेवा

वाळवा : गेल्या ४७ दिवसांपासून हुतात्मा साखर कारखान्यासमोर, अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी कारखान्यावर केलेले कर्ज भागवून राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसाठी अण्णांचे ज्येष्ठ चिरंजीव किरण नायकवडी आणि नातू गौरव, केदार नायकवडी यांनी सभासद, शेतकरी यांनासोबत घेऊन ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे वैभव नायकवडी यांनी राजीनामा दिला असला तरी, जोपर्यंत त्यावर कायदेशीर बाबींची पूर्तता होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाणार असल्याचे आंदोलक नेत्यांनी जाहीर केले आहे.

जोपर्यंत राजीनाम्याच्‍या सर्व प्रक्रिया रीतसर पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आमचा अजिबात विश्वास नाही. हुतात्मा संकुलातील सर्वच संस्था अक्षरशः लुबाडल्या आहेत, त्याचा हिशेब निश्चित केला जाणार आहे. अजूनही राजीनामा देऊनही त्यांची लुडबूड सुरू आहे, ती त्यांनी थांबवावी, अशी मागणी किरण नायकवडी यांनी केली आहे.

वैभव नायकवडी यांचे विश्वासू, हुतात्मा पतसंस्थेचे अध्यक्ष अजित वाजे यांचा राजीनामा घ्यायची तयारी सुरू असतानाच त्यांनी राजीनामा देऊन बाजी मारली आहे. हुतात्मा कारखान्याचा पेट्रोलपंप बझारला चालवायला दिला होता, त्यावरही अनेक आरोप केले जात होते. तो पुन्हा कारखान्याकडे घेण्यात आला आहे. तसेच लवकरच सभासद साखर विक्री दुकान बझारकडून कारखान्याकडे वर्ग करण्याची प्रक्रिया केली जात आहे, हुतात्मा बँकेकडून विविध जाचक अटी घालून आर्थिक पुरवठा करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात असल्याचा आंदोलकांचा आरोप असून आमचे पुढचे लक्ष्य हुतात्मा बँक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

कारखान्याचे उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर यांना सर्व सह्यांचे अधिकार देण्यात आले असून १६ संचालक कारभार पाहत आहेत. कारखान्यात लागेल त्या जागी कर्मचारी भरती केली जात असून सुमारे ९०० अर्ज आले आहेत. यामध्ये कार्यक्षेत्रातील गरजूंना प्राधान्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात ऊसनोंदणी केली जात असून भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या जात आहेत, गळीत हंगाम यशस्वी करण्याच्यादृष्टीने आतील कामे गतीने सुरू करण्यात आली आहेत, साडेतेरा टक्के साखर उतारा आणि साडेसहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कारखान्याला गतवैभव आणण्यासाठी सारे एकत्र आल्याचे दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT