हुतात्मा साखर कारखाना 
सांगली

Hutatma Factory Protest : संघर्ष चिघळला; गेले 17 दिवस आंदोलन कायम

समेटासाठी सक्षम नेतृत्वाचा अभाव : लवकर तोडगा निघावा ही सभासदांची इच्छा

पुढारी वृत्तसेवा

धन्वंतरी परदेशी

वाळवा : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी उभ्या केलेल्या हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्यासमोर 17 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. ते तीव्रच होते आहे. या आंदोलनावर वेळीच तोडगा निघावा, अशी सामान्य शेतकरी, सभासद आणि कामगारांची भावना आहे. मात्र दोन्ही बाजूंना अधिकारवाणीने थांबवू शकेल, असे नेतृत्व सध्या पुढे येत नसल्याने संघर्ष अधिकच चिघळत चालला आहे.

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे ज्येष्ठ चिरंजीव तथा हुतात्मा बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी आणि अरुण नायकवडी यांचे चिरंजीव केदार नायकवडी यांनी कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्याविरोधात आंदोलन छेडले आहे. सहा महिन्यांपासून नायकवडी कुटुंबातील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येऊ लागले असून, त्याचे रूपांतर आता आंदोलनात झाले आहे.

क्रांतिवीर नागनाथअण्णांनी स्वातंत्र्यानंतर शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षित समाजाला केंद्रस्थानी ठेवून अनेक सामाजिक चळवळी उभ्या केल्या. ऊस उत्पादकांसाठी खिशात एक रुपयाही नसताना उभारलेली ही चळवळ देशभरातील सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरली. केवळ सात गावे आणि आठ वाड्यांचे मर्यादित कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्याने राज्यात स्वतंत्र असा ‌‘हुतात्मा पॅटर्न‌’ निर्माण केला. चांगला ऊसदर, उच्च साखर उतारा आणि कामगार, सभासद व ऊसतोड मजूर यांची जपलेली त्रिसूत्री, यामुळे हुतात्मा कारखाना राज्यातील सहकार चळवळीचा दीपस्तंभ ठरला. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील तब्बल 55 पुरस्कारांनीही कारखान्याचा लौकिक वाढविला.

आंदोलकांनी अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत विविध शासकीय विभागांकडे तक्रारी केल्या आहेत. संबंधित खात्याने साखरेच्या गोदामावर कारवाई केल्याने आंदोलनाला आणखी धार मिळाली. वैभव नायकवडी यांनी कारखान्यावर कोट्यवधींचे कर्ज केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. कर्ज फेडून वैभव नायकवडी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे.

सतरा दिवसात वैभव नायकवडी आंदोलनस्थळी न आल्याने आंदोलकांमधील असंतोष अधिक वाढत आहे. दोन्ही बाजूंनी पत्रकबाजी, आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने सामान्य सभासद संभ्रमात पडले आहेत. आंदोलकांनी अध्यक्षांच्या दालनास कुलूप ठोकले आहे, तर दुसरीकडे संचालक मंडळाने उपाध्यक्षांकडे सर्व अधिकार देत मासिक सभा घेतल्याचे समोर आले आहे.

एन. डी. पाटील यांची आठवण

दोन्ही बाजूंमध्ये समेट घडवून आणण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले; मात्र त्याला यश आले नाही. माजी मंत्री एन. डी. पाटील यांच्या निधनानंतर हुतात्मा संकुलातील वाद मिटवू शकेल, असे कणखर नेतृत्व उरले नसल्याची भावना व्यक्त होत आहे. एन. डी. पाटील यांच्या शब्दाला मान होता. सध्या प्रभावी नेतृत्वाचा अभाव असल्याने संघर्ष अधिकच लांबत चालला आहे.

मागे वळून पाहताना...

  • एका कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही बाकीच्या कारखान्यांसाठी काही पुरस्कार ठेवताय का? अशी मिश्किल टिप्पणी करत ‌‘हुतात्मा‌’च्या यशाचे कौतुक केले होते.

  • अल्पभूधारक, अल्पशिक्षित आणि दलित सभासदही कारखान्याच्या अध्यक्षपदी पोहोचला, हे हुतात्मा चळवळीचे वेगळेपण मानले जात होते. मात्र वैभव नायकवडी अध्यक्ष झाल्यानंतर कारखान्यातील धोरणांमध्ये बदल होऊ लागला.

  • काही सामाजिक चळवळी कमजोर झाल्या, काही बंद पडल्या आणि कारखाना सामाजिक बांधिलकीपासून दूर जाऊ लागल्याची टीका आंदोलकांकडून केली जात आहे.

  • खासगीकरणाच्या चर्चांनाही उधाण आले होते. त्यास प्रखर विरोध झाल्यानंतर स्थिती शांत झाली. तेथूनच कारखान्याच्या ओहोटीला सुरुवात झाल्याचे मत व्यक्त होत आहे.

आगामी गळीत हंगामाबाबत चिंता

दोन्ही बाजूंनी, कारखाना हे अण्णांचे स्मारक असून तो वाचला पाहिजे, अशी भूमिका घेतली जात असली तरी, आगामी गळीत हंगामाबाबत शेतकरी चिंतेत आहेत.

संचालकांची फरफट

संघर्षात संचालक आणि अधिकाऱ्यांची मोठी फरफट सुरू आहे. कारखान्यातील नियमित कामकाज सुरू असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा आहे, इतकेच.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT